BMC : मुंबईत महापालिकेच्या केंद्रात ३०० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण

220

बोरिवली (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रात तब्बल ३०० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण (बीएमटी) करण्यात आले आहे. अतिशय क्लिष्ट असलेले बोनमॅरो प्रत्यारोपण करून या केंद्राने मागील ५ वर्षात अशा अनेक बालकांना सामान्य जीवन जगण्यास मदत केली आहे.

बोनमॅरो प्रत्यारोपणामुळे थॅलासेमिया रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. थॅलेसिमियाग्रस्त रूग्णांमध्ये योग्य त्या प्रमाणात लाल रक्त पेशी तयार होत नसल्याने त्यांना नियमितपणे रक्त देण्याची गरज असते. मात्र, या रूग्णांना अनुरूप बोनमॅरोचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आल्याने या बालकांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणात लाल रक्त पेशी तयार करू लागते, अशी माहिती उपचार केंद्राच्या संचालिका डॉ. ममता मंगलानी यांनी दिली आहे.

bmc1

त्याचबरोबर रक्ताचा कर्करोग म्हणजे लुकेमीया आणि अनेक इतर कर्करोगांसाठी देखील या केंद्रात बोनमॅरो प्रत्यारोपण व इतर संबंधित उपचार केले जातात. यानुसार गेल्या पाच वर्षात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक बालकांवर विविध स्तरीय उपचार करण्यात आले आहेत, असेही डॉ. मंगलानी यांनी सांगितले आहे. बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्राच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी या केंद्राला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी या केंद्राला नुकतीच भेट देऊन तेथील डॉक्टरांशी व सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

(हेही वाचा BMC : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ताफ्यात आणखी ३२ कॉम्पॅक्टर)

नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या केंद्राकडून सातत्याने आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. याचाच एक भाग म्हणून थॅलेसिमियाग्रस्त, रक्तदोषाने आणि कर्करोगानेग्रस्त बालकांना सामान्य बालकांप्रमाणे जीवन जगता यावे, या उद्देशाने २०१७ साली महानगरपालिकेने बोरिवली (पूर्व) परिसरात हे उपचार केंद्र सुरू केले. या केंद्रात जून २०१८ पासून बोनमॅरो प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी उपचार केंद्रात जून २०१८ पासून २६ जुलै २०२३ पर्यंत तब्बल ३०० बोनमॅरो प्रत्योरोपणाची (बोन मॅरो ट्रान्सप्लांट / बीएमटी) कार्यवाही पूर्ण करण्याचे कौतुकास्पद कार्य उपचार केंद्राच्या डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले आहे. बीएमटी फिजिशियन, बालरोग रक्तदोष कर्करोग तज्ज्ञांसह एक पथक या सेवेसाठी समर्पित आहे. या केंद्रात दरवर्षी सुमारे ६० ते ८० प्रत्यारोपण केले जातात. यामध्ये ‘अॅलोजेनिक’ आणि ‘ऑटोलॉगस’ प्रत्यारोपण या दोन्हीं प्रक्रियांचा समावेश आहे. या केंद्रात डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे १६८ एवढे मनुष्यबळ कार्यरत आहेत, अशी माहितीही केंद्राद्वारे देण्यात आली आहे. या केंद्राला ‘सी.एस.आर.’ सह दानशूर व्यक्तींकडून आर्थिक स्वरूपात किंवा वस्तु स्वरूपात देणग्या प्राप्त होत असतात. या केंद्राला देण्यात येणाऱ्या आर्थिक देणग्या या आयकर विभागाच्या ‘८० जी’ या नियमानुसार योग्य त्या आयकर विषयक लाभांसाठी पात्र आहेत.

बोनमॅरो प्रत्यारोपण म्हणजे काय?

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये लाल पेशी दूषित असल्यामुळे त्यांच्या शरीरात योग्य त्या प्रमाणात रक्त तयार होत नाही. त्यामुळे त्यांना नियमितपणे अनुरुप रक्तदात्याचे रक्त घेऊन लाल पेशी द्याव्या लागतात. तथापि, अशा रुग्णांच्या शरीरात अनुरुप बोनमॅरोचे प्रत्यारोपण यशस्वीपणे केल्यास त्यांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणातील पेशींसह रक्त तयार करु लागते. ज्यामुळे बोनमॅरोच्या यशस्वी प्रत्यारोपणानंतर या रुग्णांना रक्त देण्याची आवश्यकता भासत नाही व रुग्ण थॅलेसेमियामुक्त होतो. थॅलासेमियामध्ये बोनमॅरो प्रत्यारोपण हे सामान्यपणे ८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये केले गेल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात. तसेच रुग्णाच्या भावाचा किंवा बहिणीचा बोनमॅरो अनुरुप ठरण्याची शक्यता अधिक असते.

बोनमॅरो प्रत्यारोपण नि:शुल्क

बोनमॅरो अनुरुप असल्याची चाचणी सकारात्मक आल्यानंतर बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यासाठी खासगी रूग्णालयात २५ ते ४० लाख रूपयांची आवश्यकता असते. परंतु, महानगरपालिकेच्या सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी उपचार केंद्रात ही सुविधा निःशुल्क आहे. बोनमॅरो प्रत्यारोपणासाठी सर्वसाधारणपणे ३० दिवस ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीत बालकासोबत आई, वडील किंवा सर्वात जवळचा नातेवाईक रुग्णालयामध्ये राहू शकतो. या रूग्णासोबत असलेल्या व्यक्तीला देखील राहण्यासह भोजनाची सुविधा दिली जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.