BMC: मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसमोर अपेक्षांचा डोंगर !

3265
BMC: मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसमोर अपेक्षांचा डोंगर !

>> सचिन धानजी 

मुंबई महापालिकेची (BMC) सूत्रे आता अत्यंत शांत स्वभावाच्या, अभ्यासू तसेच चिकित्सक वृत्तीच्या, मराठी भाषेचा पुरस्कर्ता असलेल्या अधिकाऱ्याच्या हाती आली आहे. इक्बालसिंह चहल गेले आणि त्यांच्या जागी भूषण गगराणी महापालिका आयुक्त म्हणून विराजमान झाले; परंतु गगराणी यांच्याकडे मुंबईकर मोठ्या अपेक्षेने पाहत असून मुंबईतील नागरी विकासकामे, प्रकल्पांची कामे, सेवा सुविधा आदींसह महापालिकेची आरोग्य व्यवस्था तसेच महापालिकेची आर्थिक स्थिती याबाबत जनतेच्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे निश्चितच गगराणी यांच्यासमोरे मोठी आव्हाने आहेत. ही आव्हाने स्वीकारून मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी गगराणी यांना मोठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे.

महापालिकेचा कारभार कसा चालतो?
मुळात आयुक्तांचा कच्चा दुवा म्हणजे त्यांनी मुंबईत कोणतेही पद भूषवलेले नाही. मुंबईचे स्थायिक असणे, राहणे याबरोबरच महापालिकेचा कारभार कसा चालतो, त्याअंतर्गत काय काय विभाग येतात, कुणाच्या अखत्यारित काय येते, कोणत्या प्राधिकरणाची जबाबदारी काय आहे, अशाप्रकारे सर्व महापालिका कारभाराची भौगोलिक आणि कामकाजाच्या दृष्टीने माहिती असणे आवश्यक असते. गगराणी यांची ही मोठी कमजोरी आहे. त्यामुळे जोवर ते महापालिकेचा कारभार आणि त्यांची कार्यपद्धती, अधिकाऱ्यांची जबाबदारी तसेच आणि महापालिका हद्दीसह विभाग आणि खात्याअंतर्गत केल्या जाणाऱ्या विविध कामांची उजळणी करून घेत नाही तोवर गगराणी यांना महापालिका समजून घेणे कठीण आहे. मुळात यापूर्वीचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनाही महापालिका ज्ञात नव्हती किंवा महापालिकेचा अनुभव नव्हता; पण कोविडमुळे त्यांना सर्व लक्ष हे याच साथीच्या आजारावर केंद्रित करावे लागले. त्यामुळे त्यांना ही महापालिका समजून घेण्यास अवधी मिळाला होता. त्या तुलनेत गगराणी यांना हा अवधी कमी आहे. आयुक्तपदी विराजमान होताच गगराणी यांनी मी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत काम करणार असल्याची घोषणा केली; परंतु आपण १२ तास सेवा केली म्हणजे चांगले आयुक्त आहात असे होत नाही, तर जनतेला अभिप्रेत किती आणि कसे काम करता हेही महत्त्वाचे आहे.

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : सरकारी कर्मचाऱ्यांना प्रचार पडणार महागात; मोठी कारवाई होणार)

आयुक्तांच्या नियुक्तीत ज्येष्ठता नव्हे, तर कर्तृत्व कौशल्य हा निकष हवा
महापालिकेला आज खऱ्या अर्थाने एका अनुभवी आणि महापालिकेच्या कारभाराची जाण असलेल्या आयुक्तांची गरज होती; परंतु आता जो सरकारच्या मर्जीतील असतो, त्यांचेच ऐकतो, त्याचीच वर्णी लागते. आज या महापालिकेत अनेक आयुक्त होऊन गेले. या अनेकांपैकी काही सामर्थ्यशाली ठरले, तर काही दुबळे तर काही होयबा म्हणणारे होते. आयुक्तांची नियुक्ती करताना त्यांची ज्येष्ठता नव्हे, तर त्यांचे कर्तृत्व कौशल्य हा एकमेव निकष असायला पाहिजे. त्यामुळे अलिकडच्या काळात नियुक्त करण्यात आलेल्या आयुक्तांनी त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी पार पाडण्याची त्यांची क्षमता नव्हती. अशा प्रकारची जी टीका होते, ती याच कारणामुळे.

जनतेमधील समज, गैरसमज आपल्या कामांमधून दूर करायला हवा
अलिकडच्या वर्षात राज्य शासन आणि मुंबई महापालिका यांच्यातील सत्तेचा समतोल निश्चितच बदलला असून तो शासनाच्या बाजूने अधिक झुकणारा ठरला आहे. गगराणी हे महापालिकेत येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपला अधिकारी महापालिकेत बसवला किंवा हे आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच काम करणार अशी समज जनतेमध्ये निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे आयुक्तांना आता जनतेमधील हा समज, गैरसमज आपल्या कामांमधून दूर करायला हवा. मुंबई महापालिकेने जी काही सव्वा दोन लाख कोटी रुपयांच्या प्रकल्प कामांना सुरुवात केली आहे, ती कामे मार्गी लागणारच आहेत; परंतु भविष्यात त्यासाठी लागणारा पैसा कमी पडणार नाही किंबहुना त्यासाठी अधिक पैसा उभारणी करायचा आहे तो जमा करण्याचे प्रमुख आव्हान आयुक्तांसमोर आहे.

अनेक वर्षांपासून जे थकबाकीदार आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष
महापालिकेला जीएसटीच्या रुपात जकात कराची नुकसान भरपाई मिळत असली मालमत्ता कराची आकारणी आणि वसुली ही सर्वांत महत्त्वाची आहे. आज महापालिका प्रशासन हे केवळ चालू आर्थिक वर्षांतील कर वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्याचे प्रयत्न करत असते; परंतु मागील अनेक वर्षांपासून जे थकबाकीदार आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्याकडे आता लक्ष वेधले गेले आहे, ही जमेची बाजू आहे.

आयुक्त म्हणून हे पाऊल आपल्याला उचलावे लागेल
परंतु आजही प्रत्यक्ष जागेचा वापर तसेच त्यांचे क्षेत्रफळ कागदावर कमी दाखवली जाते आणि कराची आकारणी मालकाला कमी करत त्याचा मोबदला काही अधिकारी स्वत:च्या खिशात घालत आहेत, अशा ज्या काही तक्रारी येत आहेत, त्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक जागांचे मोजमाप आणि त्यांच्या प्रत्यक्षातील वापर याचे गणित जुळवले गेले, तरी महापालिकेच्या मालमत्ता कर आकारणीत लक्षणीय वाढ झालेली पहायला मिळेल, त्यामुळे आयुक्त म्हणून हे पाऊल आपल्याला उचलावे लागेल.

राजकीय मांजरे आडवी येतात
५ वर्षांनी भांडवली मूल्य आधारित कर आकारणीच्या वाढीला राजकीय इच्छाशक्तीअभावी रोख लागला जातो, त्या तुलनेत हे पाऊल उचलल्यास महापालिकेची भविष्यातील मोठी आर्थिक चणचणच दूर होईल. आज कोणतीही करवाढ किंवा दरवाढ करायची झाली, तरी राजकीय मांजरे आडवी येतात. त्या तुलनेत ही करवाढ किंवा दरवाढ होईल तेव्हा होईल, पण त्यातही कर आणि दराच्या रुपातील महसुलात वाढ कशी होईल याचा अभ्यास आणि धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे.

प्रशासनाचा दर्जा आणि कार्यक्षमता वाढविण्याची गरज
आज सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आयुक्तांना कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे; कारण पटलावर हजारो कर्मचाऱ्यांचा आकडा दिसत असला, तरी प्रत्यक्षात किती कर्मचारी काम करतात हेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे जे कर्मचारी केवळ हजेरी नोंदवण्यापुरतेच दिवस भरतात त्यांना शिस्त लावण्याची पहिली गरज आहे आणि इथूनच आपल्या कामाची सुरुवात व्हायला पाहिजे. सर्व वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी ठराविक कालावधीनंतर सेवांतर्गत प्रशिक्षणा दिले जावे. कर्मचाऱ्यांना जे काम नेमून दिले असेल ते करण्यास ते योग्य आहेत की नाही याचे मूल्यमापन खात्यांतर्गत चाचण्या घेऊन केले पाहिजे. या चाचण्यात जे अनुत्तीर्ण होतील त्यांना हटवणे त्यामुळे शक्य होईल. प्रशासनाचा दर्जा आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने प्रामाणिकपणे टाकलेले हे योग्य पाऊल आहे, अशी कामगार संघटनांसह सर्व कर्मचाऱ्यांना खात्री वाटली पाहिजे, अशा कामाची आपल्याकडून अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या जागांना अकस्मात भेटी
आयुक्त म्हणून आपण या सर्व विभाग कार्यालयांना अचानक भेटी देणे आणि प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी प्रथम आपल्या भेटी देत कामाचा आढावा घेणे व त्यांची कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक ठरणार आहे. यासाठी दररोज काही तास घालवणे महत्त्वाचे आहे तसेच महत्त्वाचे प्रकल्प जिथे राबवले जात आहेत अशी ठिकाणी, मोठी रुग्णालये, बाजार आणि अशा महत्त्वाच्या जागांना अकस्मात भेटी देणे हे अत्यंत उपयुक्त ठरेल. खुद्द आयुक्तच दौऱ्यावर येणार आहेत, असे नुसते कळले तरी कर्मचारी सतर्क होतात. केवळ पालिका कर्मचारीच नव्हे, तर कंत्राटदारही सावध होतात.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून कारवाई
आज सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे पदपथावरून चालण्याचा. आज चालण्यासाठी एकही व्यवस्थित पदपथ नाही आणि असतीलच तरी ती फेरीवाल्यांनी किंवा हातगाड्यांनी अडवलेली असेल. वस्तू विकणाऱ्या फेरीवाल्यांबरोबरच रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचा त्रासही वाढू लागला आहे. त्यामुळे चायनीज भेल व इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून कारवाई व्हायला पाहिजे. त्यामुळे पदपथ या किमान जनतेला सुरक्षित चालण्यासाठी आहेत याची जाणीव फेरीवाल्यांना करून देत त्या जर जनतेला मोकळ्या करून दिल्यास जनतेच्या ह्रदयात आपली जागा कायमच राहील. वाढते फेरीवाले आणि त्यांच्याकडून होणारा पदपथ, रस्ते आणि मोकळ्या जागांवरील अतिक्रमण हा सर्वांत मोठा जटील प्रश्न आहे. त्यातून सुवर्णमध्य आपल्याला काढावा लागेल.

याचिका या फास्ट ट्रॅकवर निकालात काढण्यासाठी प्रयत्न
आज पुलाखालील जागेत जुनी वाहने भंगारवजा पडलेली असून त्या भंगाराची विल्हेवाट लावून सार्वजनिक शौचालय आणि उद्यानाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जावा तसेच मुंबईतील सर्वात मोठा गहन आणि चिंतेचा विषय म्हणजे झोपड्या आणि बांधकामाचे अतिक्रमण. अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे या बाबत अनेकदा न्यायालयाने महापालिकेचे कान उपटल्यानंतरही यावर ठोस कारवाई करता आलेली नाही. त्यामुळे आधी आपल्याला अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे तोडण्याची मोहीम हाती घ्यावी लागेल. जे शासन निर्णयानुसार पात्र असतील त्यांना वगळून जे बांधकामे अनधिकृत आहेत त्यांच्यावर तरी कारवाई करा, ही कारवाई करायला महापालिकेचे हात कोणी रोखले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या याचिका या फास्ट ट्रॅकवर निकालात काढण्यासाठी प्रयत्न करणे हेही आपल्यासमोरील प्रमुख आव्हान आहे, असो असे बरेच मुद्दे आहेत; पण यातून आयुक्त म्हणून गगराणी काय स्वीकारतात आणि जनतेच्या पसंतीला उतरतात हेच आता पुढील काळच सांगेल.

आपलेही नाव पुढे घेतले जावे
आयुक्तांचा स्वभाव शांत आणि साधेपणाचा आहे. त्यांनी साधे राहावे, पण महापालिकेचा कारभार हाकताना हा साधेपणा चालणार नाही, कारभारात साधेपणा सोडून कडक भूमिका अंगिकारावी लागेल, तरच आपण कुठे तरी यापूर्वीच्या द. म. सुखटणकर, सदाशिव तिनईकर, गिरीश गोखले, सुबोध कुमार, जयराज फाटक, अजोय मेहता या आयुक्तांच्या रांगेत जाऊन बसाल आणि आज महापालिकेतून आयुक्त म्हणून गेल्यानंतरही तसेच ते सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांची नावे आदराने घेतली जातात तसेच आपलेही नाव पुढे घेतले जावे असेच अपेक्षित कार्य आपल्याकडून घडावे, ही अपेक्षा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.