BMC School : शाळेचा पहिला दिवस; मुलांशी संवाद साधताना आयुक्तांना आठवले आपले शिक्षक आणि मुख्याध्यापक

95
BMC School : शाळेचा पहिला दिवस; मुलांशी संवाद साधताना आयुक्तांना आठवले आपले शिक्षक आणि मुख्याध्यापक
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

महापालिका शाळेतील मुलांचा पहिल्याच दिवशी स्वत: महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी हे पोयसर येथील पब्लिक स्कूलमध्ये उपस्थित राहिले. यावेळी मुलांशी संवाद साधताना त्यांना आपल्या शालेय जीवनातील दिवस आठवले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयुक्त म्हणाले की, मी जेव्हा-जेव्हा शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधतो तेव्हा मला माझे शालेय जीवन, शिक्षक, मुख्याध्यापक आठवतात. त्यांच्याबद्दल आदर वाटतो. शालेय जीवनात आपल्यावर होणारे संस्कार कायमस्वरुपी असतात. म्हणूनच चांगल्या शिक्षणासाठी आवश्यक असणारी वातावरणनिर्मिती महानगरपालिकेकडून केली जाते, असा विश्वास व्यक्त केला. (BMC School)

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली (पश्चिम) येथील पोयसर महानगरपालिका शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ आणि शालेय साहित्य वितरण सोहळा गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी १६ जून २०२५ रोजी पार पडला, यावेळी ते बोलत होते. उप आयुक्त (परिमंडळ ७) संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक या सोहळ्यास उपस्थित होते. (BMC School)

(हेही वाचा – BMC School : महापालिका शाळांमधील मुलांचा असा गेला पहिला दिवस)

कार्यक्रमात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गगराणी यांच्या हस्ते २७ प्रकारच्या शालेय साहित्याचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले. इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शालेय साहित्य वाटपासोबत आयुक्त गगराणी यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशीही संवाद साधला. शाळेच्या पहिल्या दिवशी स्वतः महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी यांनी गुलाब पुष्प, चॉकलेट देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केल्याने सर्व विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. (BMC School)

याप्रसंगी संबोधित करताना गगराणी म्हणाले, मी जेव्हा-जेव्हा शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधतो तेव्हा मला माझे शालेय जीवन, शिक्षक, मुख्याध्यापक आठवतात. त्यांच्याबद्दल आदर वाटतो. शालेय जीवनात आपल्यावर होणारे संस्कार कायमस्वरुपी असतात. म्हणूनच चांगल्या शिक्षणासाठी आवश्यक असणारी वातावरणनिर्मिती महानगरपालिकेकडून केली जाते. त्यासाठी शिक्षकांनीही शिकविण्याची हातोटी जोपासावी, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची कला अवगत करावी, शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन संकल्पना शाळेत राबवाव्यात. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असा विश्वास गगराणी यांनी व्यक्त केला. (BMC School)

(हेही वाचा – Water Cut : येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी विलेपार्ले आणि अंधेरी भागांत येणार नाही पाणी)

उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी प्रास्ताविकात शाळा प्रवेशोत्सवाची तयारी, शालेय साहित्य वाटपांबाबतची माहिती दिली. रिमझिम पावसाच्या वातावरणात महानगरपालिका सर्व शाळांच्या प्रवेशद्वारावर रांगोळी, शाळा आणि वर्गखोल्यांमध्ये सजावट, ढोलताशांचा गजर, लेझीम नृत्य अशा उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. शाळेच्या पहिल्याच दिवशी दप्तर, पुस्तके आणि शालेय वस्तू मिळाल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. (BMC School)

मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १६ जून २०२५ रोजी सर्व प्रकारचे शालोपयोगी शैक्षणिक साहित्य मोफत वितरित करण्यात येत आहे. या साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दप्तर, बूट, सॅण्डल, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे. (BMC School)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.