-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महानगरपालिकेने केलेल्या पावसाळी नियोजनानुसार, सखल भागातील पाणी उपसा करण्यासाठी नियुक्त केलेल्या लघु उदंचन केंद्र परिचालकांनी निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे यंत्रणा न उभारल्याने तसेच पुरेशा क्षमतेने कार्यान्वित केली नाही, या कारणाने त्यांना प्रत्येकी १० लाख रूपयांचा दंड आकारण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, हिंदमाता, गांधी मार्केट, येलो गेट आणि चुनाभट्टी लघु उदंचन केंद्र परिचालकांकडून प्रत्येकी १० लाख रूपये म्हणजेच एकूण ४० लाख रूपये दंड ठोठावला आहे. (BMC)
नागरी भागात पावसाचे पाणी साचू नये, सखल भागांमध्ये साचणारे पावसाचे पाणी उपसून वाहून नेता यावे, पर्यायाने रस्ते वाहतूक सुरळीत राहावी तसेच पावसाळी पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा यासाठी महानगरपालिकेने विविध ठिकाणी १० ठिकाणी लघू उदंचन केंद्र (मिनी पंपिंग स्टेशन) उभारली आहेत. या केंद्रांचे देखभाल कंत्राटदारामार्फत केले जाते. त्यासाठी निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्तीही ठरवून देण्यात आल्या आहेत. २५ मे २०२५ पर्यंत संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मुंबईत सोमवारी २६ मे २०२५ रोजी मे महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद झाली. अवघ्या १३ तासांमध्ये २५० मिलीमीटर पावसाची नोंद अनेक ठिकाणी झाली. सततच्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर कार्यरत होती. (BMC)
(हेही वाचा – Mumbai Rain : हिंदमाताला पाणी तुंबले जावे ही शिवसेना उबाठाची इच्छा?)
परंतु, हिंदमाता, गांधी मार्केट, यलो गेट आणि चुनाभट्टी येथे अतिसखल भागात जोरदार पावसाने पाणी साचल्याचे निदर्शनास आले. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी नेमलेली लघू उदंचन केंद्र यंत्रणा पुरेशा क्षमतेने व वेळेत कार्यान्वित झाली नाही, असे आढळून आले. याचा विपरित परिणाम म्हणून, हिंदमाता व गांधी मार्केट सारख्या परिसरात वाहतूक व जनजीवन बाधित झाले. तसेच, मस्जिद उपनगरीय रेल्वे स्थानक परिसरांमध्ये काही मिनिटे पाणी साचून उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. चुनाभट्टी येथे फारसा पाऊस झाला नसला तरी याठिकाणी पंप पूर्ण क्षमतेने कार्यरत नव्हते. याची दखल घेऊन देखभाल करणाऱ्या कंपनीला दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. (BMC)
या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने हिंदमाता, गांधी मार्केट, यलो गेट आणि चुनाभट्टी येथील लघु उदंचन केंद्र चालवणाऱ्या कंपनीला निविदा अटी व शर्तीप्रमाणे यंत्रणा न उभारल्याचा, पुरेशा क्षमतेने व वेळेत यंत्रणा कार्यान्वित केली नाही, असा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, प्रत्येकी १० लाख रूपये याप्रमाणे एकूण ४० लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पावसाळी नियोजनानुसार नेमून दिलेल्या कामकाजात, कार्यवाहीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, त्रुटी खपवून घेतली जाणार नाही. तसे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुन्हा एकदा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community