BMC : रस्त्यावरील खड्डा छोटा असतानाच बुजवा, चाळण होण्याची वाट पाहू नका; आयुक्तांनी दिली अभियंत्यांना ताकीद

836
BMC : रस्त्यावरील खड्डा छोटा असतानाच बुजवा, चाळण होण्याची वाट पाहू नका; आयुक्तांनी दिली अभियंत्यांना ताकीद
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

कोणताही खड्डा एका रात्रीत मोठा होत नाही. खड्डा ६ ते १२ इंचाचा असतानाच तो भरणे अपेक्षित आहे. रस्त्यांची चाळण झालेली, खड्ड्यात रस्ता अशा बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत. संबंधितांवर अत्‍यंत सक्‍त कारवाई केली जाईल. कोणत्‍याही परिस्थितीत अशी स्थिती उद्भवणार नाही, याची दक्षता घ्‍यावी, अशी ताकीद महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दिली आहे. तसेच खड्डा भरताना तो चौकोनी आकारात भरावा. त्‍याचा आकार ओबडधोबड नसावा. सहा मीटर पुढील रस्‍त्‍यांवर आढळणारे खड्डे बुजविण्‍यासाठी कोल्‍ड मिक्‍सचा वापर करू नये. केवळ मास्टिक अस्‍फाल्‍टद्वारे खड्डे बुजवावेत. या व्‍यतिरिक्‍त काही रस्‍त्‍यांवर जीओ पॉलिमर काँक्रिटचा वापर करावा, अशा सूचनाही बांगर यांनी केल्‍या आहेत. (BMC)

पावसाळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी रस्‍ते व वाहतूक विभागाच्‍या अभियंत्‍यांची सोमवारी ९ जून २०२५ बैठक घेतली, त्‍यावेळी त्‍यांनी हे निर्देश दिले. महानगरपालिका मुख्‍यालयात झालेल्‍या या बैठकीस अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर, उपायुक्‍त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (रस्‍ते व वाहतूक) गिरीश निकम यांच्‍यासह उपप्रमुख अभियंता, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता आदी उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – BMC : सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी ५१४ पंप; तरीही आणखी १० वाहनरुढ पंपांची व्यवस्था)

महानगरपालिकेने रस्‍त्‍यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सर्व २२७ निवडणूक प्रभागातील नियुक्‍त दुय्यम अभियंत्यांनी नेमून दिलेल्या क्षेत्रात दररोज दौरा करावा. स्वयंप्रेरणेने, अधिक सक्रियपणे खड्डे शोधावेत. खड्डे छोट्या आकारांचे असतानाच ते भरावेत, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मुंबईकरांना रस्ते प्रवासादरम्यान कोणत्याही गैरसोयींना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून कार्यवाही करावी. रस्‍त्‍याची चाळण झाल्‍याचे निदर्शनास आल्‍यास कडक कारवाई केली जाईल, असा सक्‍त इशारादेखील गगराणी यांनी दिला आहे. (BMC)

जोरदार व सततच्‍या पावसाने रस्‍त्‍यांवर होणारे खड्डे भरण्‍याकामी कंत्राटदार नियुक्‍तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित कंत्राटदारांकडून रस्त्यावरील खड्डे तातडीने भरले जातील, यासाठी दुय्यम अभियंत्‍यांनी सजग राहिले पाहिजे. त्यामुळे प्रतिवर्षी खड्ड्यांची संख्या आणि समस्या हळूहळू कमी होत आहे. भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्डय़ांची समस्या निश्चितच कमी होणार आहे. सन २०२३, २०२४ आणि २०२५ या तीनही वर्षांमध्‍ये प्रतिवर्ष खड्डे भरण्‍याकामी केल्‍या जाणाऱ्या खर्चामध्‍ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असल्याचे गगराणी यांनी स्पष्ट केले. (BMC)

(हेही वाचा – ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये चोख भूमिका बजावल्यानंतर डीजीएमओ Lt Gen Rajiv Ghai आता लष्कराचे रणनिती उपप्रमुख)

मुंबईतील २२७ प्रभागातील दुय्यम अभियंत्यांकडे प्रत्‍येकी १० ते १५ किलोमीटर रस्‍ते कार्यक्षेत्राची जबाबदारी आहे. फक्‍त कार्यालयात बसून कोणीही कामकाजाचा आढावा घेऊ नये,अशाही कानपिचक्या त्यांनी दिल्या आहेत. खड्ड्याच्‍या दृष्‍टीकोनातून रस्‍त्‍याची पाहणी करताना दुय्यम अभियंत्‍यांनी दोन दिवसातून एकदा दुचाकीवरून दौरा करावा. जेणेकरून रस्‍त्‍याचा संपूर्ण विस्‍तार नजरेखाली येऊ शकेल. रस्‍त्‍याची स्थिती कळू शकेल. स्वयंप्रेरणेने, अधिक सक्रियपणे खड्डे शोधून ते वेळीच भरावेत. तक्रार आल्‍यानंतर खड्डे भरणे ही अस्‍वीकारार्ह बाब आहे. अभियंत्‍यानी सक्रियपणे खड्डे शोधून ते तातडीने भरल्‍यास नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागणार नाही. (BMC)

खड्डे भरण्‍याची कार्यवाही आठवडाभर सुरू राहणार असली तरी शनिवार आणि रविवार या दोन्‍ही दिवशी खड्डे बुजविण्‍याची कामे अधिक वेगाने करावीत, असे नमूद करताना बांगर म्‍हणाले की, शनिवारी आणि रविवारी इतर दिवसांच्‍या तुलनेत वाहतुकीची वर्दळ कमी असते. त्‍यामुळे या दोन्‍ही दिवशी खड्डे बुजविण्‍याची कार्यवाही अधिक वेगाने करावी, असेही त्यांनी निर्देश दिले आहे, प्रत्‍येक कंत्राटदारामागे मास्टिक प्रकल्‍प असावेत. जेणेकरून एका प्रकल्‍पाचा पुरवठा बाधित झाल्‍यास तर दुसरा पर्याय उपलब्‍ध राहिल. शनिवार आणि रविवार कोणते मास्टिक प्रकल्‍प सुरू राहणार आहेत याची निश्चिती आठवड्याच्‍या सुरूवातीलाच करावी जेणेकरून खड्डे भरण्‍याची कार्यवाही आठवडाभर सुरू राहिल, असेही अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.