
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आल्या असल्या तरी पुन्हा त्याच ठिकाणी ते ठाण मांडून बसत असल्याने महापालिका प्रशासन आणि पोलीस या दोघांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जात होती. परंतु मागील काही दिवसांपासून दादर रेल्वे स्थानक परिसर हे पूर्णपणे फेरीवाला मुक्त झालेले पाहायला मिळत आहे. शनिवार आणि रविवारच्या दिवशी फेरीवाले स्टेशन परिसरात व्यवसाय करताना दिसत असले तरी मागील शनिवार आणि रविवार आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी दादर पश्चिम परिसरात फेरीवाल्यांची धंदा थाटण्याची हिंमतही होत नाही. बऱ्याच वर्षांनी अशी कडक कारवाई झाल्याने रेल्वे प्रवाशांसह नागरिकांना स्थानिक रहिवाशांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. (Hawker)
दादर पश्चिम रेल्वे स्थानका बाहेरील फेरीवाल्यांना हटवणे, स्वच्छता राखणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिका, रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), जिआरपी आणि दादर आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने ठोस उपाययोजना आखण्यात ६ मे २०२५ रोजी दुपारी आरपीएफ कार्यालयात पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार, दादर रेल्वे यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण) मारोती मावडे यांनी यावर चर्चा करून दररोज संयुक्त कारवाई करणे, आठवड्याला स्वच्छता तपासणी याबाबत माहिती दिली, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्यासह रेल्वे आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या भागात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे होणारी गर्दी, त्यांच्याकडून रेल्वे स्थानक परिसर आणि त्यांच्या जगात माल साठवणूक केली जात असल्याने त्यावर कडक कारवाई करणे आणि सी.सी टीव्ही बसवणे आणि गस्त वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. (Hawker)
(हेही वाचा – अमेरिकेचे राष्ट्रपती Donald Trump यांचा दावा, भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार; भारताच्या घोषणेकडे लक्ष)
या बैठकीनंतर सर्व अधिकाऱ्यांनी स्टेशन परिसराची पाहणी केली. मुख्य प्रवेशद्वार आणि प्लॅटफॉर्म क्र. १ जवळ फेरीवाल्यांचा साठवून ठेवलेला माल, मार्ग अरुंद असल्याने कारवाईच्या वेळी होणारी धक्काबुक्की आणि त्या परिसरात विखुरलेला कचरा आढळला, यावर तात्काळ माल जप्त करणे आणि स्वच्छता मोहीम राबवण्याचे ठरले. त्यानुसार प्रथमच दादर रेल्वे स्थानक हे पोलिस आणि महापालिका यांच्या संयुक्त कारवाईमुळे फेरीवाला मुक्त ठेवण्यात यश येत असून येथील स्थानिक नागरिकांसह रेल्वे प्रवाशांची मागील अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे. (Hawker)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानक परिसर दीडशे मीटर फेरीवाला मुक्त ठेवण्याचे आदेश असतानाही आज व याकडे दुर्लक्ष होत होतं मात्र मुंबई महापालिकेने मुंबईतील २० ठिकाणी फेरीवाला मुक्त करण्याचा आधी घेतलेली मोहीम आणि त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिलेले आदेश यामुळे महापालिका (परिमंडळ २) चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शना खाली कारवाई केली जात होती. आता मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी देवेन भारती यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्याचे निर्देश दिल्याने आता पोलिसांची साथ महापालिकेला लाभल्याने आता पोलिस आणि महापालिका हे दोन्ही आता हातात हात घालून काम करत असल्याने तसेच आवश्यक तिथे महिला पोलिस तैनात केल्याने आता दादर पश्चिम परिसरातील फेरीवाल्यांचा पडलेला विळखा सोडवण्यात यश येताना पाहायला मिळत आहे. (Hawker)
(हेही वाचा – India-Pakistan Tension : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, भारतीय सैन्यावर आम्हाला गर्व…)
त्यामुळे आता महापालिका (परिमंडळ २) चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शना खाली जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली दादर आणि शिवाजी पार्क पोलिस तसेच रेल्वे जिआरपी तसेच आरपीएफ यांच्याशी समन्वय राखून कारवाई केली जात असल्याने दादरकरांना वेगळाच अनुभव मिळत असून ही कारवाई पुढेही कायम राहो आणि आम्हाला चालण्यास रस्ता आणि पदपथ मोकळा मिळो, हीच प्रार्थना येथील रहिवाशी करतांना दिसत आहे जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी पोलिसांचे सहकार्य लाभत असल्याने महापालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे दादर स्टेशन परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. (Hawker)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community