BMC : पावसाळापूर्व कामांची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांची घाटकोपर, विक्रोळी, मुलुंडमध्ये धाव

810
BMC : पावसाळापूर्व कामांची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांची घाटकोपर, विक्रोळी, मुलुंडमध्ये धाव

पावसाळा पूर्व कामांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापालिका आयुक्त रस्त्यांवर उतरले असून प्रत्येक अतिरिक्त आयुक्त हे आपापल्या भागातील नाल्यांसह मॅनहोल्स आणि दरडप्रवण क्षेत्रांची पाहणी करत आहे. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगर) डॉ. अमित सैनी यांनी पूर्व उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि मुलुंडमधील भागांची पाहणी करण्यासाठी या भागांमध्ये धाव घेतली, परंतु पूर्व उपनगरांत कुर्ला, विद्याविहार, मानखुर्द, देवना, चेंबूर, भांडुप यांचाही समावेश आहे याचा बहुधा सैनी यांना विसर पडला. त्यामुळे केवळ तीन भागांची पाहणी करून सैनी यांनी लहान मोठ्या नाल्यांमध्यील गाळ काढण्याच्या कामाला अधिक वेग द्या. त्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना राबवा. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश देत पाहणी दौरा आटोपता घेतला. (BMC)

महानगरपालिकेच्या परिमंडळ सहा मधील घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड (एन, एस आणि टी विभाग) परिसरातील सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांची तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींची आणि दरडप्रवण क्षेत्राची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी सोमवार (दिनांक २७ मे २०२४) प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. त्यानंतर एन विभाग कार्यालयात आढावा बैठक घेतली. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून, मुंबई महानगरातील नद्या आणि नाल्यांमधील गाळ काढण्यात येत आहे. (BMC)

(हेही वाचा – Vitthal Mandir : तब्बल 79 दिवसांनी पंढरपुरात भाविकांना विठुरायाला करता येणार चरण स्पर्श)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली या कामांना अधिक वेग देण्यात आला आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी एन, एस आणि टी विभागात सोमवारी २७ मे २०२४ रोजी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. उप आयुक्त (परिमंडळ ६) रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त (एन विभाग) गजानन बेल्लाळे, सहायक आयुक्त (टी विभाग) अजय पाटणे आदींसह पर्जन्य जलवाहिन्या, घन कचरा व्यवस्थापन विभाग, मलनि:सारण प्रचालन, म्हाडा, मेट्रो, एमआरआयडीसी, वन विभाग, रेल्वे प्राधिकरण आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. (BMC)

मोडकळीस आलेल्या इमारती आणि दरडप्रवण क्षेत्राची पाहणी

अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी एन विभागातील विक्रोळी परिसरातील राम नगर येथील मोडकळीस आलेल्या इमारतींची आणि दरडप्रवण क्षेत्राचीही पाहणी केली. येथील रहिवाशांमध्ये संभाव्य नैसर्गिक आपत्तीबाबत जनजागृती करा, असे निर्देश सैनी यांनी अधिकाऱ्यांना दिले. (BMC)

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी स्वत: तपासले मॅनहोल

डॉ. अमित सैनी यांनी पूर्व उपनगरातील एन विभागात मलनिःसारण, पर्जन्य जलवाहिन्यांवर मनुष्य प्रवेशिकांच्या (मॅनहोल) जागी लावलेल्या प्रतिबंधक जाळी तसेच झाकणांचीही पाहणी केली. पर्जन्य जलवाहिन्यांवर मनुष्य प्रवेशिकांच्या (मॅनहोल) जागी प्रतिबंधक जाळ्या व झाकणे व्यवस्थित बसविलेल्या आहेत किंवा कसे याची सैनी यांनी स्वत: खात्री केली. अनेक ठिकाणी त्यांनी स्वत: मॅनहोलच्या जाळ्या उचलून तपासल्या. तसेच आवश्यक त्या सर्व ठिकाणी मनुष्य प्रवेशिकांवर जाळी आणि झाकणे बसविण्याची कार्यवाही वेगाने करण्याच्या सूचनाही यंत्रणेला केल्या. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.