सामाजिक न्याय सप्ताहानिमित्त भाजपच्या वतीने महापुरूषांचे पुतळे व परिसर स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. दक्षिण मध्य मुंबई भाजपच्या वतीने यासाठी ‘स्वच्छता रथ’ तयार करुन त्याद्वारे महापुरुषांचे पुतळे, म्युरल आणि धार्मिक ठिकाणे ही धूळमुक्त करुन त्यांची साफसफाई केली जाते.
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या आदेशाने तसेच दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्या संकल्पनेतून “स्वच्छता रथ” बनवण्यात आला आहे. याद्वारे या जिल्ह्यातील सर्व महापुरूषांचे पुतळे व परिसर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ शीव कोळीवाडा विधानसभा मतदार संघातून करण्यात आले. या स्वच्छता रथाचे उद्घाटन आमदार आशिष शेलार, जिल्हा प्रभारी व आमदार प्रसाद लाड, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार तमिल सेल्वन यांच्या उपस्थितीत शीव येथील राणी लक्ष्मीबाई चौक येथ करण्यात आले. यामध्ये शीव परिसरातील शीव आगरवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, कॉमन मॅन पुतळा, येशू क्रिस्तीचा चौक, राणी लक्ष्मीबाई चौक येथील म्युरल आदींसह सर्व ठिकाणांची पाण्याने धुवून स्वच्छता केली गेली.
(हेही वाचा मोदींची पदवी मागणाऱ्या ‘आप’चे दोन डझनहून अधिक आमदार विनापदवीधर!)
सामाजिक न्याय सप्ताहानिमित्त हा स्वच्छता रथ बनवण्यात आला असून या वाहनातून सिन्टॅक्सच्या टाकीतून पाणी नेवुन त्याद्वारे ही ठिकाणे स्वच्छ केली जाते. शीव कोळीवाडानंतर चेंबूर, माहिम-दादर, वडाळा आदी भागांमध्ये या स्वच्छता रथाद्वारे पुतळे व ठिकाणांची स्वच्छता केली आहे. यामध्ये चेंबूरमधील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा, आंबेडकर उद्यानातील पुर्णाकृती पुतळा, शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, वीर सावरकर स्मारकातील म्युरल, माँसाहेब मिनाताई ठाकरे पुतळ्याशेजारी म्युरल, राम गणेश गडकरी चौकातील पुतळा, तसेच वडाळा येथील दोन बुध्दविहार तसेच इतर ठिकाणे आदींची स्वच्छता करण्यात आली आहे. बुधवारी धारावी आणि गरुवारी अणुशक्ती नगर विधानसभा मतदार संघात या अभियानाचा समारोप करण्यात येणार आहेत. या अभियानात सुमारे ११० पुतळे, म्युरल आणि सार्वजनिक ठिकाण व चौकांची पाण्याद्वारे स्वच्छता केली जाणार आहे,असे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी स्पष्ट केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा महामंत्री विलास आंबेकर, श्रीनिवास शुक्ला, निरज उभारे आदींनी यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.