भाजपाची आयुक्तांसमोर गांधीगिरी

...अन्यथा भाजपाच्या वतीने होणार तीव्र आंदोलन

120

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी राजकीय दबावाखाली, पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून संवैधानिक नियम तथा निर्देश धाब्यावर बसवले आहे. लोकशाही मूल्य पायदळी तुडवून प्रभाग रचनेत केलेल्या अन्याय फेरफार घोटाळयाबाबत आणि त्याद्वारे मुंबईकरांच्या केलेल्या फसवणुकीबाबत सोमवारी भाजपा नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांधी टोपी घालून महापालिका आयुक्तांना गुलाबपुष्प दिले. इतकेच नाही तर अनोखे गांधीगिरी आंदोलन केले आहे. तसेच प्रत्येक नगरसेवकाने आयुक्तांना वैयक्तिक भेट देत गुलाबपुष्प भेट दिले. यावेळी भाजपाचे ८२ नगरसेवक असताना केवळ ६० गुलाबपुष्प तेथे दिसून आलेत. यावेळी आयुक्तांसोबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी देखील उपस्थित होते.

पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय 

मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. शिवसेनेने एका बाह्य खाजगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना बनवून रातोरात आयुक्तांच्या संगनमताने पेन ड्राइव्ह बदलल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. यामध्ये प्रभागांच्या सीमारेषांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकिय सोयीसाठी बेकायदेशीर फेरफार करण्यात आला असून या पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा दावाही भारतीय जनता पक्षाने केला आहे. भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या दालनाबाहेर जमा होत त्यांनी आयुक्तांची भेट घेत त्यांना गुलाबपुष्प भेट दिली. प्रत्येक नगरसेवकांनी दिलेले पुष्प आयुक्तांनी प्रेमाने स्वीकारले. यावेळी आयुक्तांनी, या सर्व नगरसेवकांना बसून चर्चा करू असे सांगितले. परंतु गांधीगिरीच्या माध्यमातून केलेल्या या आंदोलनात भाजपच्या नगरसेवकांनी चर्चा न करता एक गुलाबपुष्प भेट देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

(हेही वाचा- ‘#ShivsenaCheatsMumbaikar’ का सुरु झालाय ट्विटर ट्रेंड?)

…अन्यथा भाजपाच्या वतीने होणार तीव्र आंदोलन

‘नवी प्रभाग पुनर्रचना’ सत्ताधारी शिवसेनेने केवळ आपला राजकीय फायदा पाहून केली असून भ्रष्टाचाराची गटारगंगा अव्याहत वाहत ठेवण्यासाठी पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठीच केली, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत पावले उचलून प्रभाग आराखड्याची पडताळणी नि:पक्षपातीपणे करावी, अशी मागणी भाजपाने लेखी पत्राद्वारे केली आहे. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील, असा इशारा गटनेते शिंदे यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.