भारतीय खगोलशास्त्र (Astronomy) आणि विज्ञान (Science) क्षेत्राला आज मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विचारवंत आणि लेखक डॉ. जयंत नारळीकर (Jayant Narlikar) यांचे निधन झाले आहे. त्यांनी पुण्यात वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय विज्ञानविश्वातील एक तेजस्वी तारा मावळला आहे.
डॉ. नारळीकर हे अल्बर्ट आईन्स्टाईन (Albert Einstein) यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताशी सुसंगत असलेल्या हॉईल-नारळीकर सिद्धांताचे सहलेखक होते. त्यांनी सुप्रसिद्ध ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल (Fred Hoyle) यांच्यासोबत मिळून हे क्रांतिकारी कार्य केले होते. त्यांच्या कार्यामुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र क्षेत्रात गाजले.
(हेही वाचा – ‘फोनवरील तक्रार एफआयआर होणार’ ; वाढती सायबर फसवणूक टाळण्यासाठी Central government चे मोठं पाऊल)
डॉ. नारळीकर हे केवळ वैज्ञानिकच नव्हते, तर विज्ञानाचे सामान्यांपर्यंत सुलभ भाषेत विवेचन करणारे लोकप्रिय लेखकही होते. विज्ञान प्रसारासाठी त्यांनी अनेक पुस्तके आणि लेख लिहिले. त्यांच्या सहज, सोप्या भाषेतील लेखनामुळे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण झाली.
त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण यांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान लाभले होते. त्यांनी स्थापन केलेल्या आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्रातून (IUCAA, पुणे) अनेक नव्या संशोधन प्रकल्पांना चालना मिळाली.
त्यांच्या निधनाने भारताने एक दूरदृष्टी असलेला वैज्ञानिक, अभ्यासू विचारवंत आणि विज्ञानाचा खऱ्या अर्थाने जनतेशी संवाद साधणारा दूत गमावला आहे. विज्ञानप्रेमी, विद्यार्थी आणि देशातील वैज्ञानिक समुदायाने एक आदर्श व्यक्तिमत्व गमावले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community