भारतीय सैन्यही चीनमध्ये घुसखोरी करते; भालचंद्र नेमाडे यांचे बेताल वक्तव्य

114

मागील दोन दिवसांपासून देशातील साहित्य क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे त्यांच्या बेताल वक्तव्याने वादात सापडले आहेत. चीनच्या सैन्याने दोन वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात घुसखोरी करून रक्तरंजित संघर्ष केला होता. त्यानंतर सोमवारी, १२ डिसेंबर रोजी चीनचे सैनिक यांनी अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करून पुन्हा संघर्ष केला. त्यामुळे भारत-चीन हा संघर्ष पुन्हा समोर आला आहे. अशा वेळी भालचंद्र नेमाडे यांनी चीन हा भारताचा शत्रू नाही. चीनचे सैन्य जसे घुसखोरी करतात, तसे भारतीय सैन्यही चीनमध्ये घुसखोरी करतात, असे बेताल वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले भालचंद्र नेमाडे? 

शेजारील देशातील स्थिती पहा. फक्त रशियाचे युद्ध सुरु आहे, युरोपात कुठे युद्ध सुरु आहे? बाकी सगळे देश आनंदात राहत आहेत. पूर्वी हिटलरच्या काळात ते युद्ध करायचे, आता फक्त आपल्याच देशात युद्धाचे वातावरण आहे. आपलाच देश चांगला, दुसरा देश वाईट असे म्हटले जात आहे. पाकिस्तानात जाऊन पाहिले, तर अशीच आपल्यासारखी लोक आहेत. गरीब आहेत, पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड करतात. त्यांच्या बाया लेकरे कडेवर घेऊन कामाला जातात. युद्ध करायचे तर त्या बायांवर बॉम्ब टाकावा लागेल. शिपायांनी शिपायांना मारणे वेगळे आहे, पण ते तसे करत नाही. चीनमध्येही तसेच आहे. अतिशय गरीब लोक तिथे राहतात. काही महिने मी चीनमध्ये होतो, गरीब बिचारे लोक आहेत तिथे, कष्टाने पोट भरतात. चीन आपला शत्रू आहे असे म्हणणे चुकीचे आहे. चिनी सरकार आपले शत्रू असेल. त्यांचे सैनिक आपल्याकडे येतात, माऱ्यामाऱ्या करतात हे चुकीचे आहे. आपलेही सैनिक तेच करतात आणि त्यांचेही सैनिक तेच करतात, असे भालचंद्र नेमाडे म्हणाले.

(हेही वाचा India China Faceoff: अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये चकमक)

काय म्हणाले लक्ष्मीकांत देशमुख? 

भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्याचा विरोध अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केला आहे. जेव्हा आपण वाजपेयी सरकारच्या काळात अणू चाचणी केली, तेव्हा संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी चीन भारताचा शत्रू आहे असे म्हणाले होते. तसेच पाकिस्तानही शत्रू आहे. या दोन देशांनी आपल्या देशावर ४ युद्धे लादली आहेत. त्यामुळे त्यांना शत्रू न मानणे चुकीचे आहे. तेथील राज्यकर्ते, लष्कर हे आपल्याशी वैर ठेवतात. शी झिंगपिंग हे भारताच्या विरोधात आक्रमक धोरण स्वीकारतात, त्यांच्या विस्तारवादी धोरणामुळे अर्धा डझन देशांशी शत्रुत्व ठेवले आहे. त्यामुळे भारताने कायम सैन्य तयार ठेवले पाहिजे. भारतात विकास आणि शांततेसाठी सीमा सुरक्षित ठेवल्या पाहिजे. आजचे केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रात योग्य काम करत आहे, असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.