BEST : येत्या २४ ते ४८ तासांत ‘बेस्ट’ची सेवा पूर्ववत होणार – मंगलप्रभात लोढा

114

बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, येत्या २४ ते ४८ तासांत पूर्ववत करणार असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी परिवहनचे प्रधान सचिव पराग जैन, बीईएसटीचे आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते.

बेस्टच्या ताफ्यात एकूण ३,०५२ बसेस आहेत. त्यापैकी १,३८१ बसेस ह्या बेस्ट च्या मालकीच्या असून, १,६७१ बसेस भाडे तत्वारवार आहेत. बेस्टच्या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारद्वारे बेस्टच्या ताफ्यात ३,०५२ बसेस पैकी २,६५१ बसेस नागरिकांच्या सेवेत कार्यरत करण्यात आलेल्या आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या च्या सहयोगाने १८० बसेस, २०० पेक्षा जास्त स्कुल बसेस सुद्धा नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सध्या ४०० बसेसचा तुटवडा असून, तो भरून काढण्यासाठी आणि आवश्यक चालक शोधण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

(हेही वाचा Bhalchandra Nemade : हिंदूद्वेषी नेमाडेंनी ज्ञानपीठ पुरस्काराचा अपमान केला – कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे)

कंत्राटी कामगारांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यासंदर्भात भाडेतत्वारवारील बसेसच्या मालकांसह, दोन वेळा बैठक घेण्यात आली. यावेळी कामगारांची किमान वेतनाची मागणी, त्यांचा दिवाळी बोनसचा विषय, त्यांना आवश्यक सोयी सुविधा, या सर्वांची कायदेशीर पूर्तता व्हावी असे सरकारतर्फे बसेसच्या मालकांना सांगण्यात आले. कंत्राटी कामगारांच्या मागण्या सोडवण्याबाबत सरकार उदासीन नाही आणि याबाबत पुन्हा एक बैठक घेऊ, असे देखील मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळेल

“नागरिकांना कोणताही त्रास नको आणि त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय मिळावा असे सरकारचे धोरण असून, त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच पूर्ण क्षमतेने बेस्टची सेवा रुजू होईल”
– मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री, मुंबई उपनगर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.