महापालिकेच्या आरोग्य सक्षमीकरणाबाबत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची सल्लागार समिती गठीत

133

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने देण्यात येणा-या विविध आरोग्य सेवा-सुविधांचे अधिकाधिक सक्षमीकरण करणे आणि नागरिकांना सातत्याने अधिकाधिक चांगल्या आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी महापालिकेच्यावतीने‘आरोग्य सेवा-सुविधांच्या सक्षमीकरणासाठी सल्लागार समिती’ (Advisory Committee for Improvement of Health Services Infrastructure) गठीत करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे समिती गठीत करण्यात येत असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या या समितीचा अहवाल येत्या एक ते दीड महिन्यांमध्ये महापालिका प्रशासनाला प्रथम आराखडा सादर केला जाणार आहे.

( हेही वाचा : दादर-माहिमच्या बालेकिल्ल्यावर सरवणकरांचे वर्चस्व)

आरोग्य विषयक नवनवीन अत्याधुनिक बाबींची उपलब्धता व अंमलबजावणी यासाठी मुंबई महानगरपालिकेला मार्गदर्शन करून आरोग्य व वैद्यकीय सेवा-सुविधा या सक्षमपणे आणि समर्थपणे नागरिकांना मिळण्याच्यादृष्टीकोनातून महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार एका विशेष सल्लागार समितीचे गठन मंगळवारी करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेत या सल्लागार समितीची पहिली बैठक महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती.

गठीत समितीमध्ये या सर्वांचा आहे समावेश

या समितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य संचालक डॉ. सुभाष साळुंके, महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे, टाटा समाज विज्ञान संस्थेचे (TISS) माजी अधिष्ठाता डॉ. टी. सुंदररामन, युनिसेफच्या प्रकल्प संचालिका डॉ. राजेश्वरी चंद्रशेखर, ‘नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर’चे सल्लागार तथा केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील माजी उपायुक्त डॉ. हिमांशू भूषण, राज्याच्या माजी आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांचा समावेश आहे. तसेच लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या (के. ई. एम.) अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण राठी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे आणि प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (उपनगरीय रुग्णालये) डॉ. विद्या ठाकूर या तज्ज्ञ मंडळींचा सदस्य म्हणून समितीत समावेश असणार आहे.

या समितीचे नामाभिधान ‘आरोग्य सेवा-सुविधांच्या सक्षमीकरणासाठी सल्लागार समिती’ (Advisory Committee for Improvement of Health Services Infrastructure) असे करण्यात आले आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आरोग्य विषयक सक्षमीकरणासाठी या प्रकारची सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येणा-या विविध आरोग्य सेवा-सुविधांचे अधिकाधिक सक्षमीकरण करणे आणि नागरिकांना सातत्याने अधिकाधिक चांगल्या आरोग्य सेवा-सुविधा प्रदान करणे, हा या समितीच्या कामकाजाचा प्रमुख हेतू आहे. या अनुषंगाने मंगळवारी झालेल्या बैठकी दरम्यान आरोग्य व संबंधित पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाबाबत विविध स्तरिय चर्चा करण्यात आली. तसेच या अनुषंगाने समितीद्वारे प्रथम आराखडा हा साधारणपणे एक ते दीड महिन्यात महानगरपालिका प्रशासनाकडे सादर करण्याचे आजच्या बैठकी दरम्यान निश्चित करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.