पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाने विशेष ‘पुण्यश्लोक ३००’ हे बोधचिन्ह तयार केले असून, याचा वापर आता सर्व शासकीय पत्रव्यवहारांमध्ये अनिवार्य करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांचे विचार आणि प्रेरणादायी जीवनगाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य शासनाचा संकल्प स्पष्ट झाला आहे.
अहिल्यादेवींच्या स्मृतीचा राजकीय आणि सांस्कृतिक सन्मान
या विशेष बोधचिन्हात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा फोटो असून, हे चिन्ह राज्य शासनाच्या सर्व अधिकृत पत्रांवर, परिपत्रकांवर आणि शासकीय कागदपत्रांवर छापले जाणार आहे. पर्यटन विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला असून, सर्व मंत्रालयीन विभाग, अधिनस्त कार्यालये, महामंडळे आणि इतर संबंधित शासकीय यंत्रणांना त्यांच्या स्तरावर या बोधचिन्हाचा सक्तीने वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – Draupadi Murmu : राष्ट्रपती १९ मेला केरळमधील प्रसिध्द शबरीमला मंदिरास भेट देणार)
तेजस्वी इतिहासाला आधुनिक काळाशी जोडणारा उपक्रम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) या भारतीय इतिहासातील एक तेजस्वी आणि कर्तबगार स्त्रीशक्तीचे प्रतीक मानल्या जातात. त्यांनी धार्मिक सहिष्णुता, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकामे, न्यायाधिष्ठित प्रशासन आणि स्त्रीशिक्षण यांसारख्या क्षेत्रांत आदर्श कार्य उभे केले. त्यांच्या कार्याचा जागर होण्यासाठी राज्य शासनाने यंदा जयंती वर्षात अनेक उपक्रम आखले आहेत.
चौंडीतील विशेष मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेला निर्णय
मंगळवारी (दि. ६ मे) अहिल्यादेवींच्या जन्मग्राम चौंडी येथे पार पडलेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) विविध ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर ‘पुण्यश्लोक ३००’ बोधचिन्हाचा वापर सर्व शासकीय व्यवहारात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. हा निर्णय फक्त एक औपचारिकता नसून अहिल्यादेवींच्या विचारांचा प्रसार आणि त्यांच्याविषयी जनजागृती घडविणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
जनतेशी संवादी होणारा इतिहास
राज्य शासनाच्या (State Government) या उपक्रमामुळे केवळ शासकीय यंत्रणांपुरतेच नव्हे, तर समाजाच्या विविध स्तरांमध्ये अहिल्यादेवींच्या कार्याविषयी नव्याने जाणीव निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ‘पुण्यश्लोक ३००’ हे बोधचिन्ह पुढील वर्षभर शासकीय पत्रव्यवहाराचा एक अविभाज्य भाग राहणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community