BMC : नालेसफाईच्या कामावरील शेलारांच्या आरोपांनंतर  प्रशासन म्हणाले, ३१ मे नंतर पाहणी करा; आम्हीही अधिकाऱ्यांसह तुमच्या सोबत येतो

नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या पाहणीप्रसंगी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत महापालिका पर्जन्य जलवाहिनी विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. 

125
भाजप आमदार आशिष शेलार यांनी नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी त्यांच्यासमवेत महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यांनी  आमदार महोदयांच्या प्रश्नांचे यथोचित समाधान केले  असले तरी, महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अधिका-यांनी पुन्हा एकदा संबंधित ठिकाणी पाहणी करुन कामांचा आढावा घ्यावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. नियोजित मुदतीत म्हणजे ३१ मे २०२३ पूर्वी पावसाळापूर्व गाळ काढण्याची कामे पूर्ण झालेली असतील व त्यावेळी आमदार शेलार यांचेसमवेत प्रशासन पुन्हा एकदा नाल्यांची पाहणी करेल व त्यांच्या शंकांचे निरसन होईल, असेही प्रशासनाकडून नमूद करण्यात येत आहे.
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज पश्चिम उपनगरातील नालेसफाईचा पाहणी दौरा केला. पश्चिम उपनगरातील साऊथ  एव्हेन्यू नगर – गझदर बांध नाला, पवन हंस  नाला व एस.एन.डी.टी. नाला, गजधर बांध पंपिंग स्टेशन, मिलिनेयम क्लब जवळ इर्ला नाला, मोगरा नाला, मेघवाडी नाला यांची पाहणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांनी पावसाळा जवळ आला असताना मुंबई महानगर पालिकेकडून नालेसफाई झाली आहे असे सांगत जे आकडे फेकले जात आहेत ते केवळ रतन खत्रीचे आकडे आहेत, अशी टीका  केली. केवळ २५ ते ३० टक्के काम झाल्याने नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा असून भाजप याबाबत असमाधानी असल्याचे ही त्यांनी सांगितले.
नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या पाहणीप्रसंगी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत महापालिका पर्जन्य जलवाहिनी विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, नाल्यांमधून पावसाळापूर्व गाळ काढण्याची कामे योग्यरितीने सुरु असून त्याची सर्व आकडेवारी, माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या कामांची निविदा प्रक्रियाही अत्यंत पारदर्शकपणे राबवली आहे.
मुंबई महानगरात असलेल्या नाल्यांमधून वर्षभर गाळ काढण्याची कामे केली जातात, एकूण गाळापैकी पावसाळापूर्व ७५ टक्के गाळ काढण्यात येतो. दरवर्षाप्रमाणे यंदादेखील मुंबईतील एकूण १८८ मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याचे काम हाती घेतले असून त्यांची एकूण लांबी २६८ किलोमीटर इतकी आहे. तर लहान व रस्त्यालगतचे असे मिळून सुमारे २ हजार १०० किलोमीटर लांब अंतराच्या लहान नाल्यांमधून देखील गाळ काढण्यात येत आहे.
पावसाळापूर्व गाळ काढण्याचे यंदा उद्दिष्ट ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन इतके आहे. पैकी आजपर्यंत ७ लाख ६८ हजार ३६२ मेट्रिक टन म्हणजे पावसाळापूर्व निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत ७८.४१ टक्के गाळ काढला आहे. गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. दोन सत्रांमध्ये आणि आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ व संयंत्रे नेमून ही कामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत काढलेल्या गाळाची आकडेवारी लक्षात घेता, नियोजित मुदतीत म्हणजे दिनांक ३१ मे २०२३ पूर्वी निर्धारित उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होईल.
मुंबईतील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे करताना त्याचे वेळापत्रक तयार केले जाते. त्यानुसार टप्प्या-टप्प्याने नाले स्वच्छ केले जातात. त्यानुसार, काही नाल्यांमधून गाळ काढणे पूर्ण झाले आहे, काही ठिकाणी कामे सुरु आहेत, तर उर्वरित नाल्यांमध्ये लवकरच गाळ काढणीचे काम सुरु होईल. त्यामुळे एखाद्या नाल्यात गाळ काढायचा शिल्लक असेल तर तेथे काम झाले नाही, असा अर्थ होत नाही. नियोजित मुदतीत म्हणजे दिनांक ३१ मे २०२३ पूर्वी सर्वच नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे पूर्ण केली जातील.
ज्या नाल्यांमधून गाळ काढला गेला आहे, त्या नाल्यांमध्ये नागरिकांकडून वारंवार कचरा टाकला जाण्याचे प्रकार घडतात. हा कचरा तरंगताना आढळतो. मात्र त्याचा अर्थ तेथे गाळ काढलेला नाही, असे होत नाही. तरंगता कचरा देखील नियमितपणे काढण्यात येत असला तरी नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे महानगरपालिका प्रशासनाने सातत्याने आवाहन केले आहे. गाळ काढल्याने नाला प्रवाही होत असला तरी कच-यामुळे समस्या उद्भवणार नाही, यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर, https://swd.mcgm.gov.in या लिंकवर गाळ काढण्याच्या कामांची आकडेवारी, माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ आदी उपलब्ध आहेत. हे सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुले आहे. १ लाख २० हजाराहून अधिक छायाचित्रे, ५९ हजार पेक्षा अधिक व्हिडिओ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, गाळ काढण्याच्या कामांच्या ठिकाणी तसेच गाळ वाहून नेवून टाकण्यात येत असलेल्या क्षेपणस्थळावर सीसीटीव्ही कॅमे-याद्वारे देखील लक्ष ठेवले जाते आहे. गाळ काढण्याच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया देखील नियमानुसार व पारदर्शकपणे राबविण्यात आली आहे. एकूणच, गाळ काढण्याच्या कामांचे योग्यरित्या अहवाल जतन केले जात आहेत. महानगरपालिकेने कोणत्याही कंत्राटदाराला झुकते माप दिलेले नाही. गाळ काढण्याच्या कामांची निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली. त्याचपद्धतीने प्रत्यक्ष कामे देखील पारदर्शकपणेच होत असल्याचे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.