मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची १७ पदे रिक्त, ११ पदांचा भार प्रभारी म्हणून कार्यकारी अभियंत्यांवर

238
मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची १७ पदे रिक्त, ११ पदांचा भार प्रभारी म्हणून कार्यकारी अभियंत्यांवर

सचिन धानजी

सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तपदाच्या ३३ पैकी १७ पदे ही रिक्त असून त्यातील ११ पदांवर कार्यकारी अभियंता यांची प्रभारी सहायक आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे, तर उर्वरीत अतिक्रमण निर्मुलन आणि रुग्णालये या विभागाची सहा पदे ही पूर्णपणेच रिक्त आहे. या सहायक आयुक्तपदासाठी लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उमेदवार उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी ही सामान्य प्रशासन विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांची असतानाही त्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने या सहायक आयुक्त पदासाठी अधिकारीच उपलब्ध होत नसल्याने कार्यकारी अभियंत्यांची तात्पुरती नेमणूक करून या रिक्तपदाचा कारभार हाकण्याच प्रयत्न केला जात आहे.

मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तपदांच्या जागा या लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा नियम असून यामध्ये बाहेरील उमेदवार ५० टक्के आणि महापालिका सेवेतील कर्मचारी अधिकारी यांच्यामधून ५० टक्के अशाप्रकारे या परिक्षेद्वारे सहायक आयुक्तपदासाठी निवड केली जाते. त्यानुसार सहायक आयुक्तपदासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे पुढील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये किंवा अन्य विभागांमध्ये केली जाते. परंतु सहायक आयुक्त म्हणून सेवा बजावत असताना सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना पुढे उपायुक्त म्हणून बढती मिळते. त्यानुसार सहायक आयुक्तपदी असलेल्या विश्वास शंकरवार, संजय कुऱ्हाडे, केशव उबाळे, संजोग कबरे, देवीदास क्षिरसागर, डॉ संगीता हसनाळे, किशोर गांधी, भाग्यश्री कापसे, चंदा जाधव हे उपायुक्त झाल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहे. शिवाय दोन महिन्यांपूर्वी केशव उबाळे हे सेवा निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांना बढती मिळणार आहे, तर उपायुक्त आव्हाड हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागा मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांना बढती मिळणार आहे. हे दोन्ही सहायक आयुक्त १ मे २०२३ आणि १ जुलै २०२३ पासून उपायुक्त पदासाठी पात्र झाले असून केवळ सहायक आयुक्तांची पदे रिक्त राहतील म्हणून प्रशासनाकडून त्यांना उपायुक्तपदी बढती दिली जात नाही.

(हेही वाचा – सप्तश्रृंगी बस अपघात : मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख तर जखमींवर शासकीय खर्चाने होणार उपचार)

आज २४ विभाग कार्यालयांमधील ९ प्रभागांमधील सहायक आयुक्तांची पदे रिक्त असून त्याठिकाणी या पदाचा भार प्रभारी वाहण्यासाठी कार्यकारी अभियंता यांच्यावर सोपवण्यात आला आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार कार्यकारी अभियंता यांच्यावर सहायक आयुक्तांची जबाबदारी सोपवण्यात येत असली तरी नियमित सहायक आयुक्त आणि प्रभारी सहायक आयुक्त यांच्यामधील कामांमध्ये फरक पडत असल्याने याचा परिणाम विभागांमधील सेवा सुविधांच्या कामांवर होत असतो. प्रभारी कार्यकारी अभियंता हा नियमित सहायक आयुक्तांच्या तुलनेत हुशार आणि अनुभवी असला तरी विभागातील त्यांचे सहकारी कर्मचारी व अधिकारी त्यांना जुमानत नसल्याने याचा परिणाम कामांवर होत असल्याचे दिसून येते. प्रभागांसह बाजार विभागाच्या सहायक आयुक्तपदी कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती करताना दुसरीकडे अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या तीन जागांपैंकी केवळ एकाच जागी सहायक आयुक्तांची नियुक्ती करून या विभागाला कमजोर करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा सुरु असल्याचे दिसून येते. या तीन पैंकी एका जागेवर नियमित सहायक आयुक्तांपैंकी मृदुला अंडे यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे उर्वरीत दोन पदांचा प्रभारी सोपवण्यात आला आहे. अशाप्रकारच्या नियमित सहायक आयुक्तांना प्रभागांमध्ये सामावून घेण्याऐवजी प्रशासनाने त्यांना एका कोपऱ्यात बसवले आहे.

महापालिकेच्या या सहायक आयुक्तपदासाठी दरवर्षी किंवा दोन वर्षांनी एकदा एक ते दोन पदांसाठी निवड करायला हवी होती,जी सामान्य प्रशासनाच्या कर्मचारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून झालेली नाही. सहायक आयुक्तांच्या निवडीबाबत या विभागाला काहीच पडलेले नसून सन २०१८-१९मध्ये या पदासाठी दोन उमेदवारांची निवड करण्यात आली होती. ज्यात महेश पाटील आणि मृदुला अंडे यांची निवड झाली होती. परंतु त्यानंतर कोविड काळ निघून गेल्यानंतरही ही पदे भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून केली जात नाही. पुढील मार्च ते मे २०२४मध्ये चार ते पाच उपायुक्त हे सेवा निवृत्त होत असून पुढील काही महिन्यांमध्ये या भरतीची प्रक्रिया न राबवल्यास तब्बल ८० ते ९० टक्के पदे रिक्त होऊन त्यावर प्रभारी म्हणून कार्यकारी अभियंत्यांकडून काम करून घेण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. त्यामुळे ही पदे रिक्त ठेवून एकप्रकारे महापालिका प्रशासनाचा कारभार खिळखिळा करण्याचा डाव आहे का प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.