-
प्रतिनिधी
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवसापासून भारतावर १५ लाखांहून अधिक सायबर हल्ले (Cyber Attacks) करण्यात आले असल्याचा दावा महाराष्ट्र सायबर सेलने केला आहे. हे हल्ले पाकिस्तान, इंडोनेशिया, बांगलादेश आणि मोरोक्को या देशातून करण्यात आलेले असल्याचे महाराष्ट्र सायबर सेलने म्हटले आहे. मागील २० दिवसात करण्यात आलेल्या १५ लाख हल्ल्यांपैकी १५० हल्ले यशस्वी झाल्याचा दावा महाराष्ट्र सायबरने केला आहे. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान फेक न्यूज आणि अफवाचा बाजार उठवणारे सोशल मीडियावरील ८६ आयपी अॅड्रेस शोधण्यात आले असून त्यातील अनेक खाती आणि आयपी अॅड्रेस हे भारतातील असल्याचा दावा करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Indian Economy : भारताचा विकासदर अमेरिका, चीनपेक्षाही पुढे जाणार?)
महाराष्ट्र सायबर सेलने सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देताना धक्कादायक खुलासा केला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते १२ मे या दरम्यान भारतावर १५ लाखांपेक्षा अधिक सायबर हल्ले (Cyber Attacks) करण्यात आल्याचा दावा पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सायबर सेलने केला आहे. १५ लाख हल्ल्यांपैकी १५० सायबर हल्ले यशस्वी झाल्याचा दावा देखील करण्यात महाराष्ट्र सायबर सेलने केला आहे. भारतावर करण्यात आलेले सायबर हल्ले पाकिस्तान, इंडोनेशिया, बांगलादेश आणि मोरोक्को या देशातून करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या सायबर हल्ल्यात उल्हासनगर महानगरपालिका, बदलापूर महानगरपालिका तसेच पंजाब जालंदर येथील डिफेन्स बेस येथील डेटा चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यात ते अपयशी ठरले असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – सहकार कायद्यात कालानुरूप बदल; CM Devendra Fadnavis यांची समिती स्थापनेची घोषणा)
महाराष्ट्र सायबर सेलने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतात फेक न्यूज तसेच अफवा पसरवणाऱ्या सोशल मीडियावरील ८३ संशयित खात्यांचे आयपी अॅड्रेस शोधण्यात सायबर सेलला यश आले आहे. यापैकी ३८ खाती अधिकाऱ्यांनी आधीच काढून टाकली आहेत. तपासात पुढे असे दिसून आले की ही खाती भारताविरुद्ध खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यात सक्रियपणे सहभागी होती. प्रसारित केलेल्या खोट्या बातम्यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीवर हल्ले, भारतीय हवाई दलाच्या स्थानकांवर कथित ताबा आणि विविध शहरांमध्ये व्यापक ब्लॅकआउटचे दावे करण्यात येत होते. महाराष्ट्र सायबर सेलच्या या कारवाईकडे देशातील सायबर पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. या समन्वित हल्ल्यांमागील मोठे कट उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे महाराष्ट्र सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (Cyber Attacks)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community