Hardeep Singh Nijjar : ज्याच्या हत्येवरून कॅनडा सरकारने भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, तो हरदीपसिंग निज्जर कोण होता ?

125
Hardeep Singh Nijjar : ज्याच्या हत्येवरून कॅनडा सरकारने भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, तो हरदीपसिंग निज्जर कोण होता ?
Hardeep Singh Nijjar : ज्याच्या हत्येवरून कॅनडा सरकारने भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, तो हरदीपसिंग निज्जर कोण होता ?

खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या हरदीपसिंग निज्जर याच्या कॅनडात झालेल्या हत्येशी भारताचा थेट संबंध जोडून कॅनडाने भारताबरोबरचे संबंध आता कमालीचे बिघडवले आहेत. (Hardeep Singh Nijjar) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत भारतावर या हत्येला जबाबदार असल्याचे आरोप केले. एवढ्यावरच न थांबता कॅनडाने भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला परत पाठविण्याचा निर्णयही घेतला. भारताने कॅनडाचे हे आरोप तातडीने फेटाळून लावले. शिवाय प्रत्युत्तर म्हणून कॅनडाच्याही एका राजनैतिक अधिकाऱ्यास ५ दिवसांत देश सोडून जाण्यास सांगितले आहे. भारताची डोकेदुखी असलेल्या खलिस्तानवादी अतिरेक्यांना कॅनडा कायमच आश्रय देत आलेला आहे. त्यामुळे भारताचे त्या देशाशी संबंध नेहमीच काहीसे तणावाचेच राहिले आहेत. आताच्या आततायी कृतीने त्या देशाने भारतासोबतचे संबंध पार बिघडवून टाकले आहेत. याचा परिणाम म्हणून भारत-कॅनडा यांच्यात होऊ घातलेला मुक्त व्यापार करारही भारताकडून स्थगित करण्यात आला आहे. पंजाबमधून पूर्वापार कॅनडात स्थलांतरित होण्याचे प्रमाण अधिक आहे. कॅनडात शीख समुदायाची संख्या मोठी आहे आणि आता तेथे हा एक प्रभावी समाजघटक ठरला आहे. इतकेच काय, कॅनडाच्या पंतप्रधानपदी लवकरच शीख व्यक्ती दिसू शकेल, असेही काही निरीक्षक म्हणतात. ज्याच्या हत्येवरून कॅनडा सरकारने भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, तो हरदीपसिंग निज्जर कोण होता ?

(हेही वाचा – NCP : सुप्रिया सुळे यांची विधाने वैफल्यग्रस्त भूमिकेतून; सुनील तटकरे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार)

कोण होता हरदीपसिंग निज्जर

या घटनेचे मूळ असलेला हरदीपसिंग निज्जर भारतातील जालंधर जिल्ह्यात १९७७ मध्ये जन्मला. हरदीप निज्जर १९९७ मध्ये कॅनडाला गेला. तिथे तो सुरुवातीला प्लंबर म्हणून काम करायचा. तिथे त्याचा संबंध ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या खलिस्तानवादी संघटनेशी आला. पाकिस्तानची गुप्तचर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात ‘आयएसआय’ने सुरुवातीपासून ‘बब्बर खालसा’ला बळ दिले आहे. भारताने ‘बब्बर खालसा’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करून तिच्यावर बंदी घातली आहे. हरदीपनंतर ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या संघटनेचा प्रमुख बनला. व्हॅँकुअरचे उपनगर असलेल्या सरे येथील गुरुद्वारात राहून तो भारतविरोधी कारवाया करायचा. अगदी अलीकडे तो या गुरुनानक गुरुद्वाराचा प्रमुख म्हणून निवडूनही आला होता. एका हिंदू पुजाऱ्याची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. १८ जून रोजी याच गुरुद्वाराच्या दारात अज्ञात मारेकऱ्यांनी निज्जरची गोळ्या घालून हत्या केली. तेव्हापासून कॅनडाचा भारतावर रोष आहे. (Hardeep Singh Nijjar)

या 5 मोठ्या खटल्यांमध्ये निज्जर होता आरोपी

1. निज्जरवर 2022 मध्ये पंजाबमधील जालंधर येथे एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता.

2. ऑगस्ट 2009 मध्ये राष्ट्रीय शीख संगत प्रमुख रुलदा सिंग यांची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता.

3. 2007 मध्ये लुधियानाच्या शृंगार सिनेमात झालेल्या स्फोटात निज्जरचे नाव होते. यात सहा निष्पाप लोकांचा बळी गेला.

4. पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांनी 2012 मध्ये बेअंत सिंग हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या जगतार सिंग ताराला 10 लाख रुपये दिले होते.

5. निज्जरला इंटरपोलची नोटीसही बजावण्यात आली होती. तो गुरुपतवंत सिंग पन्नूच्या एसएफजे या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता.

खलिस्तानवादाचे भूत बरीच वर्षे भारताला छळत आहे. ऐंशीच्या दशकात पंजाब दीर्घकाळ धगधगत होता. त्याचा परिणाम म्हणून खलिस्तान्यांकडून ‘एअर इंडिया’चे ‘कनिष्क’ विमान पाडणे, पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या अशा अनेक गोष्टी भारताने भोगल्या आहेत. सध्याच्या मोदी सरकारने खलिस्तानवादी संघटनांवर वरंवटा फिरवण्याचे काम नेटाने सुरू केले आहे. त्यामुळेच कॅनडातील खलिस्तानवादी बिथरले आहेत. भारताकडून आता कॅनडाशी होऊ घातलेला मुक्त व्यापार करार स्थगित करण्यात आला आहे. याशिवाय कॅनडाशी दीर्घकाळ राजनैतिक पातळीवरची लढाई भारताला लढावी लागणार आहे. (Hardeep Singh Nijjar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.