Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : भारतीय ज्ञानामुळेच पाश्चात्त्यांची वैज्ञानिक प्रगती; अमेरिकेच्या डॉ. नीलेश ओक यांनी मांडले पौराणिक संदर्भ

220

सनातन धर्म हा शब्दप्रामाण्यावर आधारित आहे; कारण आपल्या ऋषीमुनींनी जे प्रत्यक्ष अनुभवले तेच शब्दप्रमाण मानले आहे. या शब्दप्रमाणाचा आपणही अनुभव घेण्याचा प्रयत्न करायला हवा. रामायण-महाभारत आदी ग्रंथांमध्ये शेकडो खगोलीय संदर्भ आहेत. अमेरिका, कॅनडा या देशांतील ५००-६०० विद्यापिठांमध्ये या ग्रंथांचे अध्ययन केले जाते. युरोपात विज्ञानाची प्रगती झाली असली, तरी हे ज्ञान भारतातूनच विदेशात नेण्यात आले आहे. भारतातील समृद्ध ग्रंथांचे भाषांतर करूनच पाश्चात्त्यांनी आधुनिक विज्ञानामध्ये प्रगती केली आहे, असे स्पष्ट प्रतिपादन अमेरिका येथील ‘इन्स्टीट्यूट ऑफ ॲडवान्स सायन्स’चे डॉ. नीलेश नीळकंठ ओक यांनी केले. ते ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या (Vaishwik Hindu Rashtra Mahotsav) उद्घाटनप्रसंगी ‘विश्वगुरु भारताचे बलस्थान : सनातन हिंदु धर्म ’ यावर बोलत होते.

या महोत्सवासाठी इंडोनेशिया येथील रस आचार्य डॉ. धर्मयश, आफ्रीका येथील ‘इस्कॉन’चे श्रीवास दास वनचारी, महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे पू. स्वामी निर्गुणानंद पुरी, श्री स्वामी अखंडानंद गुरुकुल आश्रमाचे संस्थापक महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती, संत रामज्ञानीदास महात्यागी महाराज, प.पू.  संतोष देवजी महाराज, अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महंत डॉ. अनिकेत शास्त्री, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांसह देशविदेशांतून हिंदू संघटनांचे ४५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.

सनातन धर्मावर होणार्‍या आरोपांना  ‘हिंदु विचारक संघ’ उत्तर देणार! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’शी संबंध असलेला खलिस्तानी नेता अमृतपाल सिंह आणि काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणारा ‘रशीद इंजिनियर’ यांच्यासारखे देशविरोधी, तसेच फुटिरतावादी तुरुंगातून निवडणूक लढवून निवडून आले आहेत. ‘सेक्युलर’ लोकशाहीचा वापर करून असे फुटिरतावादी निवडून येणे राष्ट्राला धोकादायक आहे. त्यातच आता हिंदु राष्ट्र, सनातन धर्म यांना लक्ष्य करून अनेक खोटे आरोप केले जातात. अशा वेळी हिंदूंमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे या आरोपांना उत्तर देण्यासाठी ‘हिंदु विचारक संघा’ची  स्थापना झाली आहे. डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे ‘नॅरेटिव’, ‘टुल किट’, प्रसिद्धीमाध्यमे आणि राजकारणी यांना धरून केलेला अपप्रचार ‘हिंदु विचारक संघा’कडून योग्य त्या पुराव्यांच्या आधारे खोडून काढण्यात येईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी या प्रसंगी केले. (Vaishwik Hindu Rashtra Mahotsav)

या प्रसंगी ‘धर्मांतर रोखण्यासाठी आदिवासी भागात केलेले कार्य’, या विषयावर बोलतांना स्वामी प्रणवानंद सरस्वती म्हणाले, ‘‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला धर्मशिक्षण आणि नैतिकता न शिकवली गेल्याने आज मोठ्या प्रमाणात हिंदू नास्तिक बनले आहेत. धर्मशिक्षण नसल्याने आज अनेक हिंदूच धर्मांतरीत झाले आहेत. त्यामुळे यापुढील काळात आपल्याला गरीब, आदिवासी यांसारख्या लोकांमध्ये जाऊन मिसळणे अत्यावश्यक आहे. असे झाल्यास किमान पुढची पिढीतरी धर्मांतर होण्यापासून वाचेल.’’

(हेही वाचा ‘ओम् प्रमाणपत्र’ यापुढे केवळ प्रसाद आणि पूजा साहित्यापर्यंत मर्यादित नसणार; हिंदूंना सर्वच गोष्टी पवित्र मिळाल्या पाहिजेत; Ranjit Savarkar यांची घोषणा)

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर ‘हिंदू ते हिंदू व्यवसायाला प्रोत्साहन’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘आताची लढाई ही पारंपरिक नसून, आधुनिक पद्धतीची आहे. त्यात आर्थिक शस्त्र सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून मुसलमानांनी निर्माण केलेल्या समांतर अर्थव्यस्थेला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने ‘ओम शुद्ध प्रमाणपत्र’ हिंदु दुकानदारांना देण्यास प्रारंभ करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरपासून (नाशिक) हे अभियान चालू करण्यात आले आहे. हिंदु दुकानदारांना प्रसाद शुद्धीसाठी हे प्रमाणपत्र वितरित करणे चालू झाले आहे.’’ (Vaishwik Hindu Rashtra Mahotsav)

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने श्रृंगेरी येथील दक्षिणम्नाय श्री शारदा पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री भारतीतीर्थ महास्वामीजी यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखर भारती महाराज यांनी आशीर्वादरूपी संदेश पाठवला आहे. या संदेशात त्यांनी ‘सनातन धर्म सर्वश्रेष्ठ असून त्याचे ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. तसेच सनातन धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे’, असे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. ‘सर्वस्वाचा त्याग हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे, हे लक्षात घेऊन धर्मसंस्थापनेचे महान कार्य करा’, असे आवाहन त्यांनी या संदेशात केले आहे.

ग्रंथांचे प्रकाशन ! 

या प्रसंगी ‘रुग्णाची सेवाशुश्रूषा साधना म्हणून कशी करावी ?’ आणि ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचा बोध’ या दोन मराठी, ‘पुण्य-पाप यांचे प्रकार आणि परिणाम’ आणि ‘पापाचे दुष्परिणाम घालवण्यासाठी प्रायश्चित्ते’ या दोन तेलगु, तर ‘गुरूंचे महत्त्व’ या तामिळ भाषेतील एका ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

महोत्सवाचा प्रारंभ शंखनादाने आणि मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर वेदमंत्रांचे पठण झाले. या वर्षी हिंदु धर्मासाठी कार्य करतांना मृत्यू पावलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हिंदू-धर्मप्रेमींना सद्गती मिळावी यांसाठी सनातन संस्थेचे पुरोहित साधक श्री. सिद्धेश करंदीकर आणि श्री. अमर जोशी यांनी मंत्रपठण केले ! अधिवेशनाच्या निमित्ताने ट्वीटरवर VHRMGoa_Begins या हॅशटॅगद्वारे हिंदु राष्ट्राची चर्चा देशभर चालू असल्याचे दिसून आले. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.