जुडेगा भारत, तो हारेगी I.N.D.I.A

115
– जयेश शत्रुघ्न मेस्त्री 
३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी I.N.D.I.A ची बैठक मुंबईत पार पडली. त्याआधी पटणा आणि बंगळुरु येथे देखील बैठका झाल्या होत्या. आता मुंबईतील बैठकीनंतर I.N.D.I.A च्या नेत्यांमध्ये भलताच जोश दिसून येत आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी मोदींवर भ्रष्टाचारावरुन टीका केली आहे. राहुल गांधी यांना वाटत आहे की, ते २०२४ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करतील. बैठकीत सहभागी झालेल्या अनेक नेत्यांनी २०२४ ची निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
जुडेगा भारत, जितेगा I.N.D.I.A अशी या आघाडीची टॅगलाईन आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल देखील या आघाडीत आले आहेत. ममता बॅनर्जींकडे बंगाल हे महत्वाचे राज्य आहे आणि केजरींकडे दिल्ली आणि पंजाब अशी दोन राज्ये आहेत. ममता दीदी आणि केजरीवाल हे दोघेही स्वतःला पंतप्रधानपदाचा चेहरा समजत होते. मात्र आता सध्या तरी ते आघाडीत सामील झालेत. याचा अर्थ त्यांनी काही काळासाठी का होईना पण राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य केले आहे.
या सर्वांचे ध्येय एकच आहे. भाजपाला सत्तेबाहेर ठेवणे, नरेंद्र मोदींचा अश्वमेध रोखणे. मात्र नरेंद्र मोदींचा अश्वमेध रोखण्यासाठी एकही चेहरा त्यांच्याकडे नाही. म्हणूनच त्यांनी आपल्या आघाडीचे नाव I.N.D.I.A ठेवले आहे. जेणेकरुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करता येईल की I.N.D.I.A मत म्हणजेच भारताला मत. इंदिरा आणि इंडिया या दोन नावांची सांगड घालून झाल्यानंतर हा नवा डाव रचला गेला आहे. नुकतंच सरसंघचालक मोहनराव भागवत यांचं वक्तव्य समोर आलं आहे. ते म्हणाले, “या देशाचे नाव भारत आहे, इंडिया नाही. म्हणून आपण मूळ नावाचा वापर सुरु केला पाहिजे.
I.N.D.I.A आघाडीच्या पार्श्वभूमीवर भागवत यांचं वक्तव्य अतिशय महत्वाचं ठरतं. कारण I.N.D.I.A या नावातून संभ्रम निर्माण करु पाहणार्‍या या नेत्यांना ही सणसणीत चपराक आहे. मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या देशाचं प्राचीन नाव भारत आहे आणि हे हिंदू राष्ट्र आहे. सर्व भारतीय हिंदू आहेत आणि सर्व भारतीय हिंदुत्वाचे प्रतिनिधीत्व करतात. मग जर राहुल गांधी, सोनिया गांधी याणि त्यांच्या मर्जीसाठी I.N.D.I.A आघाडी निर्माण करणार्‍यांच्या मते भारत जर जोडला गेला I.N.D.I.A जिंकणार नाही, उलट हरेल. कारण I.N.D.I.A मध्ये ते नेते वा पक्ष सहभागी झाले आहेत ज्यांनी हिंदुत्व नाकारलं, ज्यांनी चंद्रयान मोहिमेची खिल्ली उडवली, ज्यांनी जातींमध्ये व धर्मांमध्ये मतभेद व्हावेत म्हणून पोषक वातावरण तयार केलं. अशा लोकांना जनता घरचा रस्ता दाखवेल.
भारत जोडण्याची प्रक्रिया २०१४ लाच सुरु झाली होती. चंद्रयान ३ या मोहिमेमुळे भारताची एकजुटता दिसून आली. त्यातही उद्धव ठाकरे यांच्या सारख्या पूर्वाश्रमीच्या हिंदुत्ववादी नेत्यांनी या मोहिमेत राजकारण आणलंच. मोदींवर टीका करताना त्यांनी या मोहिमेचा विचित्र पद्धतीने उल्लेख केला. त्यामुळे I.N.D.I.A आघाडीमध्ये सहभागी असलेले सर्व नेते हे भारतासाठी पोषक वातावरण निर्माण करु शकत नाहीत. लोकांना एकसंध ठेवू शकत नाहीत. त्यामुळे ज्यावेळी भारत जोडला जातो, त्यावेळी I.N.D.I.A या आघडीचा पराभव होतो. ते २०१४ पासून आपण सर्वांनीच अनुभवलं आहे. आघाडीचं नाव बदललं आहे, पण वृत्ती तीच आहे. जनता जागरुक आहे, शॆळीचा वेश धारण करुन आलेल्या कोल्ह्याला ते ओळखतात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.