गुलाब पाटलांना खडसावल्याबद्दल उद्धव ठाकरेंकडून नीलम गोऱ्हेंचे कौतुक

111

नीलम गोऱ्हे यांनी परवा सभागृहात कसे वागावे हे मंत्र्यालाही खडसावून सांगितले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहे. तुम्ही मंत्र्याला खडसावले म्हणून नाही तर तुम्ही ज्या पदावर बसला आहात त्या पदाला न्याय देताना आपण कुठे आहोत आणि या सभागृहाचे पावित्र्य कसे टिकवले पाहिजे हे दाखवून दिले. अगदी उद्या मुख्यमंत्रीही सभागृहात कसेही वागले तरीही त्यांची कानउघाडणी करण्याचे काम तुम्हाला करायचे आहे आणि ते केलेच पाहिजे. हे सभागृह आहे. त्यांची उंची, आदर राखलाच पाहिजे, हे तुम्हाला सांगावेच लागेल. सभागृहाप्रती लोकांच्या भावना असतात, आशास्थान असते. तिथे वागताना सगळ्यांनी एका मर्यादेत वागले पाहिजे आणि त्या मर्यादांचे भान नीलम गोऱ्हे उत्तमरीतीने करून देतात, अशा शब्दांत शिवसेना [पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ  नीलम गोऱ्हे यांचे कौतुक केले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांनी दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या वर्तवणुकीवरून खडसावले होते, त्याचा संदर्भ देत गोऱ्हे यांचे कौतुक केले.

(हेही वाचा विरोधकांशिवाय सुरू आहे पावसाळी अधिवेशन!)

भंडारा प्रकरणी सर्व महिला संघटनांनी एकत्र यावे 

नीलम गोऱ्हे यांच्या अहवाल पहिला तर त्यांच्याकडे सोपवलेला प्रश्न त्यांनी सोडवला नाही असे कधीच झाले नाही, महिला म्हणून त्यांना काही मर्यादा नाहीत, यवतमाळ येथे कर्फ्यू होता तेव्हा तिथेही त्या गेल्या होत्या. खरे तर गेल्या महिन्यात भंडाराची घटना घडली होती, महाराष्ट्रात तरी असे घडते कामा नाही. महिला अत्याचार होतो, तेव्हा जातपात आड येता काम नये. दिल्लीत निर्भया प्रकरण घडले तेव्हा अवघ्या देशाचे डोळे खाडकन उघडले होते. जेव्हा एखाद्या महिलेवर अत्याचार होतो, तेव्हा तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्याला पाठीशी घालण्याची वृत्ती नसावी, तेव्हा सर्व पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे केवळ तुमचे सरकार आहे म्हणून आम्ही बोंबलतो आणि आमचे सरकार आहे म्हणून तुम्ही बोंबलता असे म्हणण्याला काही अर्थ नाही. भंडारा प्रकरणी सर्व महिला संघटना एकत्र आल्या पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.