देशाची फाळणी वीर सावरकर यांच्यामुळे झाली आणि वीर सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितली, या वीर सावरकर यांच्यावरील दोन आक्षेपांचे या पुस्तकात आम्ही पुराव्यानिशी खंडण केले आहे. काँग्रेस मुस्लिम तुष्टीकरण करत आहे, याचे परिणाम पुढे फाळणीत होणार आहे, हे वीर सावरकर १९३७ पासून वारंवार सांगत आले, पण देशाची जनता काँग्रेसच्या प्रेमात बुडाली होती, त्यांनी ऐकले नाही, काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या नीतीमुळे फाळणी झाली, असे ‘वीर सावरकर : द मन हू कूड हॅव प्रिवेंटेड द पार्टीशन’ या पुस्तकाचे लेखक, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर म्हणाले.
…तर फाळणी टळली असती!
फाळणीच्या आधी काँग्रेसने जर मुस्लिमांच्या विरोधात हिंदू महासभा आणि अन्य घटकांना एकत्र केले असते, तरीही मुस्लिमांवर दबाब पडला असता आणि फाळणी टळली असती, पण काँग्रेसने तसे केले नाही, उलट काँग्रेस जिना सोबत चर्चा करत राहिली. काँग्रेसच्या याच नीतीमुळे देशाची फाळणी झाली, असेही उदय माहूरकर म्हणाले. तर पुस्तकाचे सह लेखक चिरायू पंडित म्हणाले की, वीर सावरकर यांनी फाळणीच्या वेळी ‘ही लढाई हिंदू – मुस्लिम, भारत-पाकिस्तान यांच्यात नाही, तर ही लढाई अखंड हिंदुस्थान आणि अखंड पाकिस्तान यांच्यात आहे’, असे म्हटले होते, म्हणूनच फाळणीनंतरही ४ युद्धे झाली. वीर सावरकर यांचा तो विचार किती दूरदृष्टीचा होता, याचा प्रत्यय येतो.
(हेही वाचा मोदी युग आणि सावरकर युग एकच! देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन)
केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर लिखित ‘वीर सावरकर : द मन हू कूड हॅव प्रिवेंटेड द पार्टीशन’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाचे सह लेखक हे सुप्रसिद्ध कवी चिरायू पंडित आहेत. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, सह लेखक चिरायू पंडित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, भाजपाचे नेते आशिष शेलार आणि भाजपचे नेते अतुल भातखळकर उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितीत मान्यवरांचे अंदमान कारागृहातील कोल्हूचे प्रतिकात्मक स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या आरंभी पुस्तकाविषयी संक्षिप्त माहिती देणारी छोटी चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रसिद्ध गायिका मुग्धा वंशपायन यांनी वीर सावरकर यांनी लिहिलेले ‘ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा प्राण तळमळला’ हे गीत गायले.
Join Our WhatsApp Community