Vaishnavi Hagavane : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. (Vaishnavi Hagavane)
(हेही वाचा – Fire : वरळीमध्ये गोदामाला आग; बचावात अग्निशमन कर्मचारी जखमी)
कोल्हापूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, एकविसाव्या शतकात मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणे हे चुकीचे आहे. मात्र, अशा परिस्थितीत देखील अशा प्रकारची वागणूक देणे हे अतिशय पाप आहे. ते पाप या ठिकाणी झालेले दिसत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना आधीच पोलिसांनी अटक केली होती. मात्र, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे (Sushil Hagawane) हे दोघे फरार होते. गेल्या सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता आणि अखेर पुणे पोलिसांनी (Pune Police) त्यांना अटक करण्यात यश मिळवलं आहे.
हगवणे कुटुंबीयांवर मकोका लागणार?
आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी कस्पटे कुटुंबीयांनी मागणी केली आहे. याबाबत ते तुमची भेट घेणार असल्याचे विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मकोका लावण्याकरता काही नियम आहेत. त्या नियमात बसले तर मकोका लागू शकेल. पण, ते त्या नियमात बसेल की नाही, यासंदर्भात आज सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
(हेही वाचा – Pakistani Spy : ISI ला नमो घाट, ज्ञानवापी, लाल किल्ल्याचे व्हिडिओ पाठवणाऱ्या, पाकिस्तानी जवानाच्या पत्नीशी संपर्कात असलेल्या हेराला अटक !)
पोलिसांनी उचित कारवाई केली
राजेंद्र हगवणे आणि सोशल हगवणेच्या अटकेपूर्वी ते बिर्याणी खात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी त्यांना पकडलेले आहे. पोलिसांनी उचित कारवाई केली आहे. यापुढेही पोलीस कारवाई करतील. आता याला खूप फाटे फोडणे, हे अतिशय चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community