राज्यसभेचा आखाडा कोल्हापूरच्या ‘मल्लांमुळे’ गाजणार! कोण कोणाला ‘असमान’ दाखवणार?

104

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. कालपर्यंत ही निवडणूक बिनविरोध होणार असे दिसत असताना अचानक सातव्या उमेदवाराची निवडणुकीच्या रिंगणात एंट्री झाल्यामुळे आता राज्यसभेवर जाणा-या काही उमेदवारांच्या मागे साडेसाती लागण्याची शक्यता आहे. या सातव्या उमेदवाराच्या येण्याने आता ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार यात काही शंका नाही.

कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना भाजपकडून राज्यसभेच्या तिस-या जागेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेने देखील कोल्हापूरच्याच संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या या दोन मल्लांमध्येच राज्यसभेचा आखाडा रंगणार असून, यामध्ये कोण कोणाला धोबीपछाड देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे हे संजय-धनंजय आहेत तरी कोण?

(हेही वाचाः ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे…’, सुप्रिया सुळेंचे आई भवानीला साकडे)

संजय पवार

  • संजय पवार हे गेली तीस वर्षे शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून मानले जातात.
  • गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत.
  • कोल्हापूरात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
  • कोल्हापूर महापालिकेत ते तीन वेळा शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
  • त्यांच्याकडे असलेल्या संघटन कौशल्यामुळे कोल्हापूरातल्या स्थानिक राजकारणावर त्यांची चांगली पकड आहे.

धनंजय महाडिक

  • काँग्रेसचे एकेकाळचे दिग्गज नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक हे धनंजय महाडिक यांचे काका.
  • मुख्य म्हणजे महाडिक हे 2004 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावरच लोकसभा निवडणूक लढले होते. पण त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
  • त्यानंतर 2014 साली महाडिक हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर थेट लोकसभेत निवडून आले होते.पण राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाशी सूत न जमल्यामुळे त्यांनी 2019 च्या निवडणुकीआधी भाजपशी सूत जुळवत पक्षांतर केले.
  • पण या निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी त्यांना मात दिली होती.
  • त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीतही त्यांचं मुष्टीयुद्ध पुन्हा एकदा शिवसेनेच्याच संजयशी होणार असल्याने,यात नेमका कोणाचा विजय होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचाः राज्यसभेच्या सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अपक्षांच्या हाती)

अपक्षांच्या हाती भविष्य

राज्यसभा निवडणुकीसाठी लागणा-या मतांच्या गणितानुसार, भाजपचे दोन, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकेक उमेदवारांना पहिल्या फटक्यातील 42 मतं मिळून राज्यसभेत सहज एंट्री मिळेल. पण यानंतर मविआकडे 27 मतं शिल्लक राहत असून भाजपकडे 29 मतं शिल्लक राहत आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या उमेदवाराचे भविष्य हे आता अपक्ष आणि इतर पक्षांच्या हातात असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.