राज्यात तीन लाख रोजगार निर्माण करणार; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

92
राज्यात तीन लाख रोजगार निर्माण करणार; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती
राज्यात तीन लाख रोजगार निर्माण करणार; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना राज्यात ७५ हजार नोकऱ्या देण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. बार्टी, सारथी आणि महाज्योती या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. १ लाख २५ हजार रोजगार उपलब्ध होण्यासाठी विविध संस्थांसोबत करार करण्यात आले आहेत. आगामी काळात तीन लाख रोजगार निर्माण करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे गुरुवारी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मार्गदर्शन करताना शिंदे यांनी जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर नक्कीच मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

युवा पिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करतोय, यामुळे संपूर्ण जगात देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. देशाची अर्थव्यवस्था ११व्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सध्या देशात जी २०च्या बैठका सुरू आहेत. जी २०चे अध्यक्षपद भारताकडे असून ही देशासाठी गौरवाची बाब आहे. देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे. त्यामुळेच युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

(हेही वाचा – शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या ३५० वर्षपूर्ती महोत्सवात सहभागी व्हा; भाजपा कार्यकर्त्यांना मुनगंटीवारांचे आवाहन)

नव्या पिढीने परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पाऊले ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे. युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या करिअरमध्ये मार्गदर्शन करण्याचा तसेच सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून या शिबिराला संदेश दिला. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन गुरुवारी राज्यातील सर्व मतदारसंघात आयोजित केले. या मार्गदर्शन शिबिराचा युवक आणि युवतींना नक्की फायदा होईल. शिबिरात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची एकत्रित माहिती मिळेल. पालकांनाही या शिबिराच्या माध्यमातून एक दिशा मिळेल. बदलत्या काळानुसार युवा पिढीला कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

स्टार्ट अपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर – नड्डा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्ने पहिले आणि ‘स्क‍िल इंडिया मिशन’ सुरू झाले. युवा पिढी प्रशिक्षित होताना पुन:प्रशिक्षण गरजेचे आहे. पुन:प्रशिक्षणानंतर पुन्हा अद्ययावत होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण दिलेल्या उमेदवारांत ६६ टक्के महिलांचा समावेश असून, पंतप्रधान कौशल्य विकास योजनेत एक कोटींहून अधिक उमेदवारांनी प्रशिक्षण घेतले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा कार्यक्रम राबवला. स्टार्ट अपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. ५०० कोटी रुपये इको सिस्टीम तयार करण्यासाठी तरतूद केली आहे, असे जे. पी. नड्डा यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप खासदार मनोज कोटक, आमदार ॲड. आशिष शेलार, आमदार मनीषा कायंदे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.