Pakistan : युद्ध तर होणारच… पण तुम्ही आरसा कधी बघणार?

तुम्ही कधी इस्रायलमध्ये मॉक ड्रील झाल्याचं ऐकलं आहे का? इस्रायलसारखा सतत युद्धात किंवा युद्धाच्या छायेत असलेला देश प्रगत कसा राहू शकतो, याचं कोडं तुम्हाला पडत नाही का?

220

स्वप्नील सावरकर 

युद्धस्य कथा रम्या असं म्हणतात. कारण, युद्धाने होणारे नुकसान अपरिमित असते. त्यामुळे, युद्धाच्या कथा ऐकणं वेगळं आणि युद्ध अनुभवणं वेगळं. तशी आपण पाकिस्तानबरोबर (Pakistan) १९४८, १९६५, १९७१, १९९९ आणि चीनबरोबर १९६२ अशी युद्ध लढलो आहोत. चीनबरोबरचा पराभव सोडला तर पाकला चारीमुंड्या चीत केलंय. अर्थात, प्रथम हल्ला समोरूनच केला गेला हा इतिहास आहे.

आज मात्र, हिंदुस्थानने पाकला कायमचा धडा शिकवावा, पाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळवावा, पाकिस्तान (Pakistan) जगाच्या नकाशावरून नष्ट करावा वगैरे अनेक सल्ले सध्या सोशल मीडियावरून सरकारला दिले जात आहेत. तसेच, हे सायबर वॉरियर युद्धकौशल्याचे ज्ञानही वाटत आहेत. काही जण तर मोदी सरकारविरोधात द्वेषाची आग ओकणारी फुसकी मिसाईल्सही सोडत आहेत. पण, हे तथाकथित वॉरियर खरं युद्ध सुरू झालं तर कुठं असतील बरं?

सध्या मॉक ड्रीलच्या बातम्यांचे पेव फुटले आहे. १९७१ नंतर प्रथमच असला काही प्रकार होत असल्याचेही बातम्यांमधून सांगितले जात आहे. परंतु, मॉक ड्रील हे केवळ देखावा आहे, कृती वेगळीच असणार आहे.

तुम्ही कधी इस्रायलमध्ये मॉक ड्रील झाल्याचं ऐकलं आहे का? इस्रायलसारखा सतत युद्धात किंवा युद्धाच्या छायेत असलेला देश प्रगत कसा राहू शकतो, याचं कोडं तुम्हाला पडत नाही का? कारण आहे ते तिथल्या शिक्षण पद्धतीत. तिथे प्रत्येक नागरिक शिक्षणानंतर एक वर्ष सैन्यदलात स्वतःच्या आयुष्याचे किमान एक वर्ष सेवा म्हणून देतो. सैनिकी शिक्षण बंधनकारक असलेल्या या देशात पहलगाम किंवा मुंबईसारखे हल्ले का होत नाहीत? आणि बाँबहल्ले वगैरे झालेच तरी तिथल्या सेवा कधीच विस्कळीत होत नाही, यामागचं कारण त्यांच्या देशप्रेमी विचारांत, शिक्षणात दडलेले आहे. आपण नेमके तिथेच कमी पडतोय. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सैनिकी शिक्षणाची गरज स्वातंत्र्यलढ्यातच व्यक्त केली होती. स्वतंत्र भारताने जर सुरुवातीपासून स्वातंत्र्यवीरांच्या विचारांचा अंगिकार केला असता तर आज कसाबसारख्या दहा दहशतवाद्यांना किंवा पहलगाममधल्या चार-पाच अतिरेक्यांना प्रशिक्षित जनतेने कंठस्नान घातले असते. परंतु, तथाकथित सेक्युलरवाद्यांच्या हातात देश राहिल्याने मेकॉलेनामक ब्रिटिश मरणोपरांतही शिक्षणपद्धतीतून जिवंत राहिला आणि एकप्रकारे आजही अप्रत्यक्षपणे अनेक बाबतीत ब्रिटिशराज सुरू असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागते.

(हेही वाचा India Vs Pakistan War : पाकड्यांना आणखी एक धक्का ! फ्रान्स आणि जर्मन विमान कंपन्यांचा पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास नकार)

असो, खरंतर, २२ एप्रिलला हल्ला झाल्यानंतर लगेचच युद्ध सुरू झालंय, हे कोणीच लक्षात घेत नाहीये. पाकिस्तानचे (Pakistan) पाणी रोखण्यावरून चेष्टा करणाऱ्यांना पाकची दूरगामी नाकेबंदी कशी केली जात आहे, हेच खरंतर पहावत नाही, असे वाटते. पाकचा शेअरबाजार अनियमितपणे वर-खाली होतोय, आधीच पिठाची वानवा होती तिथे निर्यात-आयात बंदीमुळे भूकमारी निश्चित झाली आहे. तिथली जनता किती जरी युद्धखोर, हिंदुस्थानद्वेष्टी असली तरी सैन्याप्रमाणेच जनताही पोटावरच चालते ना? ऐन उन्हाळ्यात पाणीबंदीमुळे दुष्काळ आणि पावसात पूर अशा संकटांना किती काळ तोंड देऊ शकेल ही तथाकथित गंगा-जमुना तहजीबवाली जनता?

विनाशकाले विपरीत बुद्धी…

आताचे युद्ध हे पूर्वीसारखे आमने-सामने होणार नाही, हे नक्की. मग, युद्ध म्हणजे होणार तरी काय? बांग्लादेश वेगळा करून पाकिस्तान (Pakistan) तोडण्यात आला. पण, तेव्हा बांग्लादेश भौगोलिकदृष्ट्या एकीकडे पडलेला होता. त्यामुळे, ते युद्ध काहीसे सोपे होते. पण, आता उर्वरित अखंड असलेला पाकिस्तानच तोडला जाणार आहे.

बलुचिस्तान, सिंधुस्तान आणि गिलगिट बाल्टिस्तान या तीन तुकड्यांनंतर पाकिस्तानची अवस्था काय असेल? हा घाव पाकिस्तानसाठी अधिक खोल असेल. पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रदेश असणाऱ्या बलुचिस्तानचे लोक स्वत:ला पाकिस्तानी (Pakistan) समजत नाहीत आणि गेली अनेक वर्षे बलोच जनतेचं स्वतंत्र बलुचिस्तानसाठी आंदोलन सुरू आहे. आता बलोच जनतेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे.

सिंध प्रांतामध्ये तर आताच पाण्यावरून रण पेटलंय. तिथले लोक रस्त्यावर उतरलेत. इथेही सिंधुस्तान निर्मितीची मागणी जोर धरू लागली आहे. भारताच्या बळकावलेल्या जमिनीवर म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधल्या गिलगिट बाल्टिस्तानमध्ये तर पाकिस्तानविरोधात गेले अनेक महिने उद्रेक सुरू आहे. तिथल्या लोकांनी पाकिस्तानपासून स्वातंत्र्यासाठी बंड पुकारले आहे.

जर हिंदुस्थाने फक्त हल्ल्याची तयारी केली हे ऐकूनच पाकची पळापळ होताना दिसतेय आणि या भागातल्या लोकांना बळ मिळत असेल. तर येत्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानचा (Pakistan) नकाशा कसा असेल, याचा विचार करा. थोडक्यात काय तर, पहलगाम हल्ल्याची कुरापत म्हणजे पाकिस्तानला सुचलेली विनाशकाले विपरीत बुद्धीच!

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.