महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात अपमानजनक विधाने केली होती. या विधानांमुळे त्यांच्याविरोधात महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तक्रारी, याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान शिवसेना उबाठाच्या (Shivsena UBT) नाशिक शहर उपप्रमुख बाळा दराडे (Bala Darade) यांनी राहुल गांधींना नाशिकमध्ये आलात तर तोंडाला काळे फासू असा इशारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) काही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. (Rahul Gandhi)
शिवसेना उबाठाचे नेते बाळा दाराडे (Bala Darade) म्हणाले की, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये राहतो, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत काही अपशब्द वापरले होते, त्याबाबत आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही. त्यामुळे राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळे फासू… तसेच काळे फासता आले नाही तर राहुल गांधींवर दगडफेक करु, सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास आम्ही त्यांना धडा शिकवू…जरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी, महाविकास आघाडी खड्ड्यात गेली, असंही बाळा दराडे म्हणाले. उबाठाच्या नेत्याने घेतलेल्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची १४२ वी जयंती देशभर साजरी केली जात आहे. या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शिवसेना उबाठाचे बाळा दराडे देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली सावरकरांना आदरांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन मुख्यमंत्र्यांनी विनम्र अभिवादन केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी ठाणे येथील निवासस्थानी त्यांच्या छायाचित्रास पुष्पहार घालून अभिवादन केले.