Winter Session 2023 : सत्ताधारी उत्साही तर विरोधक निरुत्साही; भाजपच्या विजयाचे विधानसभेत पडसाद

भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणा देत विरोधी पक्षाला खिजवण्याचा प्रयत्न केला.

154
Demoralized Opposition : अवसान गळालेला विरोधी पक्ष
Demoralized Opposition : अवसान गळालेला विरोधी पक्ष

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दणदणीत विजयाचे पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले. भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणा देत विरोधी पक्षाला खिजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गुरुवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आमदारांमध्ये उत्साही तर विरोधी बाकावर निरुत्साही वातावरण होते. त्यामुळे सभागृहात विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये शांतता होती. (Winter Session 2023)

आज विधानसभेचे कामकाज सुरू होण्याआधी भाजपच्या आमदारांनी सभागृहात प्रवेश करताच घोषणाबाजी सुरू केली. एमपी छत्तीसगड राजस्थान, फिरसे जितेंगे हिंदुस्थान, एक मोदी सबपे भारी, फिर एक बार मोदी सरकार…अशा घोषणा देत भाजपच्या आमदारांनी सभागृह दणाणून सोडले. या घोषणांना विरोधी पक्षाच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले नाही. भाजपचे आमदार घोषणा देत असताना काँग्रेसचे आमदार शांतपणे बाकावर बसून होते. (Winter Session 2023)

विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अवकाळी पावसाच्या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना परवानगी दिली नाही. सभागृहात शासकीय विधेयके मांडून झाल्यानंतर वडेट्टीवार यांना स्थगन प्रस्ताव मांडण्याची परवानगी मिळाली. त्यांनी आक्रमकपणे आपला प्रस्ताव मांडला. मात्र, त्यांना विरोधी पक्षाकडून पाठिंबा मिळाला नाही. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, अध्यक्षांनी त्यांना परवानगी दिली नाही. काँग्रेसचे अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज निर्विकारपणे बसून होते. (Winter Session 2023)

आज विरोधी बाकावर आमदारांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. शरद पवार गटाचे जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, उद्धव ठाकरे गटाचे सुनील प्रभू, अजय चौधरी, वैभव नाईक आदी उपस्थित होते. (Winter Session 2023)

(हेही वाचा – Malabar Hill Reservoir : शहर भागातील जनतेला पाणी उकळून आणि गाळून प्यावे लागणार!)

नवाब मलिक सभागृहात

दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणी अटक केल्यानंतर वैद्यकीय जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आज जवळपास २२ महिन्यानंतर विधानसभा कामकाजात सहभागी झाले होते. सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाजूला शेवटच्या बाकावर बसल्याने मलिक यांनी आपण अजित पवार गटासोबत असल्याचे स्पष्ट संकेत दिले. (Winter Session 2023)

विधानसभा सभागृहात येण्यापूर्वी नवाब मलिक विधानभवन परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात गेले होते. तेथे ते अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या कक्षात बसले होते. (Winter Session 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.