-
प्रतिनिधी
नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत, “मराठा समाजाला खरा त्रास झाला असेल, तर तो जरांगेंमुळेच,” असा स्फोटक आरोप केला आहे. भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात पुनर्प्रवेशानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आक्रमक भूमिका घेतलेले मनोज जरांगे पुन्हा एकदा भुजबळांविरोधात आक्रमक झाले, त्यावर उत्तर देताना भुजबळांनीही रोखठोक प्रतिक्रिया दिली.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाची धुरा सांभाळणारे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर मनोज जरांगेंनी टीका करत अजित पवार यांच्यावर जातीयवाद पोसल्याचा आरोप केला होता. “भ्रष्ट आणि जातीयवादी नेत्यांना मंत्रिपद देऊन सरकार मराठा समाजाचा अपमान करतंय,” असं म्हणत जरांगेंनी थेट अजित पवार आणि भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता.
(हेही वाचा – BMC : महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; मे महिन्याच्या पगारात मिळणार एवढी रक्कम)
या टीकेला प्रत्युत्तर देताना भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, “ह्या जरांगेनेच एवढ्या मोठ्या चुका केल्या आहेत की त्याच्या आंदोलनामुळे गावोगावी मराठा विरुद्ध ओबीसी असा तणाव निर्माण झाला. त्यामुळे सर्वाधिक नुकसान मराठा समाजाचंच झालं आहे.” ते पुढे म्हणाले, “मराठा समाज हा महाराष्ट्रातील मोठा आणि सन्माननीय घटक आहे, पण जरांगेच्या गैरमार्गाच्या आंदोलनामुळे समाजात फूट पडली. अशा जबाबदाऱ्या घेतल्यावर संयम आवश्यक असतो, तो जरांगेकडे नाही.”
या वक्तव्यांमुळे मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. एका बाजूला भुजबळ (Chhagan Bhujbal) मंत्रिमंडळात पुनरागमन करत ओबीसी मतदारांमध्ये आपली पकड मजबूत करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजातील असंतोष प्रकट करत आहेत. भुजबळ-जरांगे संघर्षाच्या नव्या पर्वाने राजकीय वातावरण तापलं असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर या वादाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवू लागले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community