विधानपरिषदेत भाजपाची कोंडी : सभापती बसवण्यासाठी बहुमत नाहीच!

88
विधानपरिषदेत आपला सभापती बसवण्यासाठी भाजपाने शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत पाचही जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले होते. मात्र, पाचपैकी तीन जागांवर पराभव झाल्यामुळे बहुमताअभावी त्यांची कोंडी होणार आहे.
विधानपरिषदेत बहुमत नसल्यामुळे भाजपाला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. सभापतीची निवड, लोकायुक्तसारखी महत्त्वाची विधेयके संमत करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधरच्या सर्व पाचही जागा जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी निर्धारित केले होते. त्यासाठी राज्यापासून केंद्रापर्यंतची सर्व पक्षयंत्रणा कामाला लागली होती. मात्र, त्यांना कोकण वगळता अन्य जागांवर यश मिळाले नाही.
प्राप्त परिस्थितीत विधानपरिषदेचे संख्याबळ ५७ इतके आहे. कारण, राज्यपाल नियुक्त १२ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ९ जागा रिक्त आहेत. एकूण संख्याबळापैकी भाजपकडे २८, तर महाविकास आघाडीकडे २९ सदस्य आहेत. त्यामुळे येत्या २८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभापती पदाची निवडणूक घेणे भाजपसाठी सध्यातरी कठीण झाले आहे. परिणामी, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या तथा उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडेच विधानपरिषदेचा कारभार राहणार आहे.

किती दिवस वाट पहावी लागणार?

सध्या विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त १२ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ९ जागा रिक्त आहेत. राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका न झाल्याने स्वराज्य संस्थांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत.  नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतरच विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल. तोपर्यंत भाजपाला वाट पहावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.