
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चौंडी-अहिल्यानगर येथे मंगळवारी (दि. ६ मे २०२५) पार पडलेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. या बैठकीत एकूण ११ निर्णयांना मान्यता देण्यात आली असून, यामुळे केवळ अहिल्यादेवींच्या स्मृतींचा गौरवच होणार नाही, तर संपूर्ण जिल्ह्याचा आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळणार आहे.
सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन
अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित व्यावसायिक मराठी आणि बहुभाषिक चित्रपट निर्मितीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वयन संस्था म्हणून काम पाहणार आहे. त्याचबरोबर, अहिल्यादेवींनी उभारलेल्या ३४ ऐतिहासिक जलस्रोतांचे सर्वेक्षण, जतन व पुनरुज्जीवन करण्यासाठी ७५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
चौंडी येथील अहिल्यादेवी स्मृतिस्थळाच्या विकासासह अष्टविनायक, तुळजाभवानी, ज्योतीबा, त्र्यंबकेश्वर, महालक्ष्मी व माहुरगड या प्रमुख धार्मिक स्थळांच्या विकासासाठी ५,५०३.६९ कोटी रुपयांच्या मंदिर विकास आराखड्यालाही मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.
(हेही वाचा – RBI : एका वर्षात रेकॉर्डब्रेक २५ टन सोन्याची खरेदी, आर्थिक वर्ष २०२४-२५…)
महिला सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’
महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, लिंगभेद, बालविवाह व कुटुंबातील हिंसाचार आदी सामाजिक प्रश्नांवर जनजागृती होणार आहे. उत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आदिशक्ती पुरस्कार’ दिला जाणार असून, यासाठी १०.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
धनगर समाजासाठी विशेष शैक्षणिक योजना
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘यशवंत विद्यार्थी योजना’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) वसतिगृह योजना’ जाहीर करण्यात आली. यशवंत योजनेत दरवर्षी १०,००० विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी निवासी शाळांमध्ये शिक्षण दिले जाणार आहे. आतापर्यंत २८८.९२ कोटी रुपये वितरित झाले आहेत.
त्याचबरोबर पुणे, नागपूर, नवी मुंबई, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथे मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०० क्षमतेची वसतिगृहे उभारली जाणार आहेत. नाशिक (Nashik) येथे काम सुरू असून इतर ठिकाणीही लवकरच सुरुवात होणार आहे.
(हेही वाचा – India Vs Pakistan War : पंजाबमधील जंगलातून RPG-IED, हँडग्रेनेड जप्त !)
आरोग्य आणि पायाभूत विकासाला चालना
अहिल्यानगर जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ आणि ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यासाठी ४८५.०८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मुली आणि महिलांसाठी नवीन आयटीआय उभारण्याचा आणि राहुरी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
इतर महत्त्वाचे निर्णय
‘मिशन महाग्राम’ कार्यक्रमाची मुदत २०२८ पर्यंत वाढवण्यात आली असून, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासाठी अध्यादेश २०२५ जारी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) घेतलेले निर्णय हे केवळ अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांना मानवंदना देणारे नसून, ग्रामीण भागाचा बहुआयामी विकास साधणारे आहेत. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या धोरणात्मक पुढाकारामुळे राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्राला नवीन दिशा मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community