Shivsena : शिवसेनेची संघटनात्मक ताकद पडली कमी

Shivsena : मुंबईत धर्माच्या नावावर झालेले मतदान आणि इतरत्र जाती धर्मासह शेतकऱ्यांच्या विरोधातील वातावरण मतदान मशीनद्वारे व्यक्त झाल्याने याचा फटका महायुतीचे घटक पक्ष म्हणून शिवसेनेला झाला.

1131
Shivsena : शिवसेनेची संघटनात्मक ताकद पडली कमी
Shivsena : शिवसेनेची संघटनात्मक ताकद पडली कमी

विशेष प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना पक्ष दुभंगल्यानंतर प्रथमच लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election 2024) सामोरे जाणाऱ्या शिवसेना पक्षाला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेने महायुतीत १५ जागा लढवल्या आणि त्यातील ७ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले. या शिवसेना पक्षाला ५० टक्के यश मिळाल्याचे पहायला मिळाले आहे. विशेष राज्यभरात शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवारांना सुमारे ७५ लाखांच्या आसपास मतदान झाले आहे, तसेच काही उमेदवार अगदी काठावर पराभूत झाले आहेत. मुंबईत धर्माच्या नावावर झालेले मतदान आणि इतरत्र जाती धर्मासह शेतकऱ्यांच्या विरोधातील वातावरण मतदान मशीनद्वारे व्यक्त झाल्याने याचा फटका महायुतीचे घटक पक्ष म्हणून शिवसेनेला झाला.

शिवसेना भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महायुतीला मनसेने जाहीर पाठिंबा दिला. राज्यातील ४८ जागांपैंकी शिवसेनेच्या वाट्याला १५ जागा आल्या. त्यात औरंगाबाद सांदीपान भुमरे, बुलढाणा प्रतापराव जाधव, हातकणंगले धैर्यशील माने, कल्याण डॉ. श्रीकांत शिंदे, मावळ श्रीरंग बारणे, उत्तर पश्चिम रविंद्र वायकर, ठाणे नरेश म्हस्के आदी विजयी झाले. हिंगोली बाबुराव कोहालीकर, कोल्हापूर संजय मंडलिक, दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे, दक्षिण मुंबई यामिनी जाधव, रामटेक राजू पारवे, शिर्डी सदाशिव लोखंडे, वाशिम राजेश्री पाटील आणि नाशिक हेमंत पाटील हे पराभूत झाले आहे. त्यामुळे सात जिंकले आणि आठ पराभूत झाले आहेत.

(हेही वाचा – प्लास्टिक उद्योगाने उत्कृष्टता जोपासत ‘ब्रँड इंडिया’ निर्माण करावा : Governor Ramesh Bais)

उबाठा शिवसेनेकडे शिवसैनिक कायम

शिवसेनेचे दोन भाग झाल्याने या शिवसेनेवर मुख्य नेता असलेल्या आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दावा केला. कायदेशीर बाबीमध्ये मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे मुख्य नेता असल्याचे जाहीर झाल्याने उद्धव ठाकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) अर्थात उबाठा शिवसेना कार्यरत केली. त्यामुळे शिवसेना महायुतीसोबत आणि उबाठा शिवसेना ही महाविकास आघाडीसोबत. शिवसेना पक्षाचे दोन भाग झाले असले, तरी शिवसेनेत वरिष्ठ नेत्यांची मांदियाळी आणि उबाठा शिवसेनेकडे शिवसैनिक कायमच राहिला. ज्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेकडे नेते होते, पण शिवसैनिक कमी होते, याचा परिणामा निवडणुकीत स्वत: झोकून देत काम करणारा आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून मतदारांना घराबाहेर काढणारा शिवसैनिक नव्हता. त्यामुळे शिवसेना ही निवडणूक लढवायला गेली; पण त्यांच्या जुने सैनिकच नसल्याने रणनितीनुसार काम करण्यात शिवसेना कमी पडली. निवडणुकीत एक वेळ नेता नसला तरी चालतो, पण मतदारांना घराबाहेर काढून मतदान करायला लावणारा कार्यकर्ता हवा आणि इथेच शिवसेनेला मोठे अपयश आले होते.

शिवसेना (Shivsena) पक्ष राज्यात सत्तेवर आल्याने शिंदे यांच्यासोबत खासदार, आमदार, माजी नगरसेवक आदी पदाधिकारी आले, पण त्यांच्यासोबत विभागातील शिवसैनिक आला नाही. नेत्यासोबत हुजरेगिरी आणि चमकेशगिरी करणारा कार्यकर्ता आला आणि हाडामांसाचा कार्यकर्ता उबाठासोबतच राहिला आणि त्याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीत उबाठा शिवसेनेने मनाविरोधात पण भाजपा आणि शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी काम करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणले. उबाठा शिवसेनेमुळे काँग्रेस (Congress) पक्ष राज्यातील सर्वांत मोठा पक्ष बनला. त्यांचे १३ खासदार निवडून आले. पण ज्या भाजपाचे २३ खासदार होते, त्यांचे केवळ ९ खासदार निवडून आले. म्हणजे शिवसेनेचा फायदा भाजपाला नाही; पण भाजपाचा फायदा शिवसेनेला झाला आणि त्यांचे ७ खासदार निवडून आले.

महायुतीत असतानाही शिवसेनेने भाजपासोबतच्या पदाधिकाऱ्यांसोबतच कायमच समन्वय राखून किंवा जबाबदारी विभागून काम करायला हवे होते, ते केले नाही, याचाही हा परिणाम आहे. मूळ शिवसेना ही कागदावर असली, तरी प्रत्यक्षात तळागाळात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे जाळे विणले जाऊन मतदारांसोबत त्यांचे घट्ट नाते जुळले नव्हते. त्यामुळे अशा परिस्थितीत शिवसेनेचे बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मतदारसंघांत मतदानाच्या काळात भाजपाची मदत घेऊन काम करण्यात शिवसेना कमी पडली. ज्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंट आणि कार्यकर्ता यांचा समन्वय नसल्याने कुठल्या पट्ट्यात मतदान कमी झाले, याच्या माहितीनुसार मतदारांना घराबाहेर काढण्यात शिवसेना आग्रही नव्हती आणि भाजपाला याची माहिती मिळत नसल्याने ते गाफिल राहिले.

शिवसेना पक्ष सत्तेवर आला; पण पक्षाची नव्याने संघटनात्मक बांधणी करण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे नेते कमी पडले. मुळात पक्ष फुटल्यानंतर पक्षाची संघटनात्मक घडी बसवणे, हे आवश्यक होते; परंतु सध्या या पक्षाचे नेते आपल्याच विभागापुरते पहायला लागल्याने जिथे नेता नाही, तेथील बांधणीकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे प्रत्येक मोठ्या नेत्यावर स्वत:च्या मतदारसंघासह इतर जिल्ह्यांसह तालुक्यांची जबाबदारी टाकून संघटनात्मक बांधणी केली असती, तर शिवसेनेला आणि पर्यायाने भाजपाला वेगळे चित्र पहायला मिळाले असते. ही लोकसभा निवडणूक होती; पण आगामी विधानसभा निवडणूक ही राज्याच्या सत्तेच्या सारीपाटाची आहे. यात विजय मिळवायचा असेल, तर शिवसेनेला आपल्या विभागांमध्ये घुसून काम करावे लागणारा आहे. शिवसेनेत गटप्रमुख हा पक्षाचा मुख्य कणा आहे. हेच गटप्रमुख शिवसेनेकडे तयार नाहीत. विभागप्रमुखाचा पत्ता नाही, तिथे उपविभागप्रमुख, महिला उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला उपशाखाप्रमुख, शाखा समन्वय आदींची नियुक्ती करण्यात न आल्याने त्यांच्या अभावी निवडणूक लढवणेच अशक्य असते. त्यामुळे शिवसेनेने आपल्या पहिल्या प्रयत्नात सुमारे ७५ लाखांहून अधिक मते मिळवतांना सात उमेदवार निवडून आणणे, हे यश असले, तरी यातून जर शिवसेना शिकली, सवरली नाही आणि झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला नाही, तर उबाठा शिवसेना अधिक मजबूत होईल आणि ही शिवसेना कमजोर होईल. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेला सुधारण्याची आणि संघटनात्मक बांधणी करण्याची शेवटची संधी आहे, यात शिवसेना यशस्वी झाली, तर हा पक्ष पुढे कधीच मागे वळून पाहणार नाही.

शिवसेना उमेदवारांना झालेले मतदान

विजयी उमेदवार

औरंगाबाद : सांदीपन भुमरे : ४,७६,१३०

बुलढाणा :  प्रतापराव जाधव : ३,४९,८६७

हातकणंगले : धैर्यशील माने : ५,२०,१९०

कल्याण : डॉ श्रीकांत शिंदे : ५,८९,६३६

मावळ :  श्रीरंग बारणे , ६,९२,३२

उत्तर पश्चिम :रविंद्र वायकर : ४,५२,६४४

ठाणे : नरेश मस्के: ७,३४,२३१

पराभूत उमेदवार

वाशिम : राजेश्री हेमंत पाटील ५,००,३३४

नाशिक : हेमंत गोडसे: ४,५४,७२८

दक्षिण मुंबई : यामिनी जाधव : ३, ४२,९८२

दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे,३, ४१,७५४

रामटेक : राजू पारवे, ५,३६, २५७

शिर्डी : सदाशिव लोखंडे :४,२६,३७१

कोल्हापूर : संजय मंडलिक: ५,९९५५८

हिंगोली : बाबुराव कोहालीकर:  ३,८३,९३३ (Shivsena)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.