शिवसेना पक्षामधून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदार फोडून शिवसेनेत उभी फूट पाडली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि संघटनेतील पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेला हा जबरदस्त धक्का समजला जात आहे. असे असले तर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील एकनाथ शिंदे वगळता अद्याप शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत, तसेच उपनेते आणि प्रवक्ते पदातीलही काही जण अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. या सगळ्यांची नावे आणि फोटो कालपर्यंत शिवसेनेच्या अधिकृत वेबसाईटवर दिसत होती, मात्र आता शिवसेनेने वेबसाइटवरून सगळीच नावे गायब केली आहेत. एक प्रकारे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी वेबसाईटवर तरी बरखास्त झाली असल्याचे दिसत आहे. वेब साईटवर केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हेच दिसत आहेत.

‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीचा IMPACT
जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदारांचा गट तयार करून भाजपा सोबत राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हा ‘हिंदुस्थान पोस्ट’ने शिवसेनेच्या वेबसाईटची बातमी प्रसिद्ध केली होती. शिवसेनेत फूट पडली, एकनाथ शिंदे स्वतंत्र झाले, तरीही वेब साईटवर एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते म्हणून कायम दिसत होते. या वृत्ताची शिवसेनेने दाखल घेतली खरी आणि वेब साईटवरून नावे काढताना कोण कधी शिंदे गटाला जाऊन मिळेल सांगता येत नाही, अशी शक्यता असल्यामुळे शिवसेनेने अवघी कार्यकारिणीचे बरखास्त केली. अर्थात सरसकट सगळेच शिवसेना नेते, उपनेते, प्रवक्ते यांची नावे गायब करून टाकली आहेत. आता वेबसाईटवर केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे तिघेच दिसत आहेत.

(हेही वाचा शिवसेनेच्या वेबसाईटवर एकनाथ शिंदे शिवसेना नेतेच! उपनेते पदी शिंदे गटातील आमदार कायम)
राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांबाबत अविश्वास?
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुभाष देसाई, लीलाधर डाके, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन कीर्तिकर, अनंत गीते, आनंद अडसूळ, चंद्रकांत खैरे आणि एकनाथ शिंदे हे होते. त्यापैकी एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यावर त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर रामदास कदम यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला. तरीही उद्धव ठाकरे वगळता उर्वरित १२ सदस्यांपैकी १० सदस्य अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असूनही उद्धव ठाकरे यांना त्यांच्याबद्दल खात्री वाटत नाही, म्हणून त्यांनी हे सर्व राष्ट्रीय कार्यकारिणी वेबसाइटवरून ‘बरखास्त’ केली. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे मनोहर जोशी, लीलाधर डाके यांची भेट घेणार आहेत. याशिवाय उपनेते आणि प्रवक्ते यांची नावेही काढून टाकली आहेत.
