
-
विशेष प्रतिनिधी
ठाकरे गटात झालेल्या मोठ्या फुटीनंतर आता महाविकास आघाडीतील आणखी एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धग वाढली आहे. पक्षात सध्या दोन भिन्न मतप्रवाह निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात भूकंपाचे संकेत मिळत असून, यामुळे शरद पवारांसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या पक्षात (Sharad Pawar) सध्या दोन प्रमुख गट उभे राहिले आहेत. एका गटाचे मत असे आहे की, पक्षाची आजची स्थिती पाहता अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणे हाच उत्तम पर्याय आहे. दुसरीकडे, दुसरा गट एनडीएच्या (NDA) सोबतीला जाण्यासाठी अनुकूल असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. काही खासदारांचे असे मत आहे की, जर एनडीए आघाडीत घटक पक्ष म्हणून सन्मानजनक संधी मिळत असेल, तर त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. विशेष म्हणजे, सत्ताधारी नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळवण्यात आणि प्रशासकीय कामात मोठी अडचण येत असल्याचे कारण ही मंडळी पुढे करत आहेत.
(हेही वाचा – Thane Watercut : ठाण्यातील काही भागात पाणी नाही)
दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भूमिकाही भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊन एनडीएसोबत राहण्याची होती, असा युक्तिवाद या गटाकडून केला जात आहे. जरी सध्या दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता धूसर असली, तरी एनडीएसोबत जाण्यात कोणतीही हरकत नसावी, असा सूर आळवला जात आहे.
दुसरीकडे, शरद पवारांनी जरी विरोधी बाकांवर बसण्याचा ठाम निर्णय घेतला असला, तरी सत्तेत जाण्यासाठी आसुसलेल्या आमदारांचा एक मोठा गट पक्षात असल्याची चर्चा आहे. जर पक्ष सत्तेबाहेरच राहिला, तर आमदारांची मोठी पळवापळव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पक्षातील या सुप्त संघर्षावर आणि दोन गटांत विभागल्या गेलेल्या नेत्यांवर शरद पवार नेमका काय तोडगा काढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अधिकृतरीत्या पक्षाचे नेते एकही आमदार फुटणार नसल्याचा दावा करत असले, तरी वाढत्या अंतर्गत अस्वस्थतेमुळे शरद पवारांच्या राजकीय चाणाक्षपणाची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
