-
प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देता येणे शक्य नसल्याची प्रांजळ कबुली सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे मंगळवारी राज्य मंत्रिपरिषदेची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीच्या पूर्वसंध्येला शिरसाट यांनी राज्य सरकारची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे अप्रत्यक्षणपणे मान्य केले. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वित्त विभागाने गेल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय तसेच आदिवासी विकास विभागाचा अनुक्रमे ४१० कोटी ३० लाख आणि ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग केला. निधी परस्पर वळविण्याचा वित्त विभागाच्या निर्णयावरून संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संताप व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
(हेही वाचा – Pakistan Earthquake : पाकिस्तान हादरलं 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप; पाकला लष्करी हल्ल्यापूर्वीच निसर्गाचा ‘दे धक्का’ )
या पार्श्वभूमीवर सोमवारी पत्रकारांशी बोलताना शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळविण्यास आपला ठाम विरोध असल्याचा पुनरुच्चार केला. फेब्रुवारी महिन्यात जेव्हा लाडक्या बहिणींसाठी निधी कपात करण्याबाबतची फाईल माझ्याकडे आली होती तेव्हा आपण निधी कपात करू नये, असा स्पष्ट अभिप्राय दिला होता, असे शिरसाट यांनी सांगितले. त्याचवेळी विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी दिला असला तरी आम्ही १५०० रुपयांचे २१०० रुपये करू शकणार नाही ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, तरीही लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अशाप्रकारे निधी वळवला गेला तर विभागाच्या योजना ठप्प होतील. आजच माझ्या खात्याकडे ३ हजार कोटीचे दायित्व आहे. अशावेळी खाते चालवणे मुश्किल होईल. सामाजिक न्याय विभागाला नियमानुसार निधी देण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अर्थसंकल्प विधिमंडळात मंजूर झाला आहे म्हणून आता त्यात काही बदल करता येणार नाही, असे नाही. त्यामुळे आमच्या विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे ११. ८ टक्के निधी द्या. हा निधी मिळाल्यानंतर कपात करण्याबाबत विचार करता येईल, असेही शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले.
(हेही वाचा – Ajit Pawar यांना मविआच्या कोणत्या नेत्याने दिली मुख्यमंत्रिपदाची ऑफर ?)
लाडकी बहीण योजनेचा राज्य सरकारवर बोजा आहे हे सर्वजण मान्य करतात. त्यामुळे त्याला विरोध करण्याचे कारण नाही. लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजेत, ही भूमिका आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या योजनेला आम्ही परिपूर्ण पैसे देणार आहोत. आता राज्याच्या तिजोरीवर जो आर्थिक भार आला आहे, तो कमी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. लाडक्या बहीण योजनेसाठी भले कर्ज काढावे लागेल पण ही योजना बंद करता येणार नाही, असेही शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी सांगितले. निधी कपात केल्याने विद्यार्थ्यांसाठीची वसतिगृहे, शिष्यवृत्तीचा निधी यावर परिणाम होणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणच्या धर्तीवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या निधीबाबत कायदा करण्याची मागणी शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी यावेळी केली. या राज्यांनी केलेल्या कायद्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या योजनांसाठी असलेल्या निधी वर्षाखेरीस अखर्चित राहिला तरी तो व्यपगत होत नाही, याकडे शिरसाट यांनी लक्ष वेधले.
(हेही वाचा – ‘Sanatan राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांना निमंत्रण)
अजित पवारांनी आभाळातून पैसे आणायचे काय? हसन मुश्रीफ
दरम्यान, निधी कपातीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांच्यावर शरसंधान साधणाऱ्या संजय शिरसाट यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय शिरसाट हे नव्यानेच मंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी. लाडक्या बहिणींना पैसे द्यायला अजित पवारांनी काय आभाळातून पैसे आणायचे काय? असा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community