-
प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि लष्कर बदला घेण्यासाठी निर्णायक पावले उचलत असतानाच, काँग्रेस आणि भांडूपचा भोंगा पाकिस्तानसदृश भाषा बोलतो आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत निरुपम यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवत, जनतेला त्यांच्या वक्तव्यांचा निषेध करण्याचे आवाहन केले.
“पाकिस्तानला किंमत मोजावी लागेल”
निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले, “पाकिस्तानला पहलगाम हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात रणनिती आखली असून, आयात-निर्यात बंद केली आहे, पाण्याचा प्रवाह रोखला आहे, समुद्री व्यापार थांबवण्यात आला आहे. भारतीय वायूसेनेचा युद्धाभ्यास सुरू असून, सिंधू जल करारही स्थगित करण्यात आला आहे. चिनाब आणि झेलम नद्यांवर धरणांची कामे थांबवून पाकिस्तानची कोंडी केली जात आहे.”
(हेही वाचा – Cyber Attack : पाकिस्तानी हॅकर्सचा सायबर हल्ला?, भारताचा संवेदनशील डेटा…)
राऊतांवर खोटेपणाचा आरोप
संजय राऊत यांना ‘भांडूपचा भोंगा’ अशी उपमा देत निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले, “संजय राऊत हे सतत महाराष्ट्रविरोधी आणि देशविरोधी बोलतात. काल त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजना बंद झाली असल्याची खोटी माहिती पसरवली. ही योजना सुरूच असून सरकार दरमहा लाभार्थींना पैसे देत आहे. भविष्यात हा लाभ २१०० रुपये करण्याचा शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्पष्ट शब्द आहे.”
“उद्धव ठाकरे भाजपामध्ये यायचा प्रयत्न करत होते”
निरुपम (Sanjay Nirupam) यांनी आणखी एक गौप्यस्फोट करत सांगितले की, “संजय राऊत ज्या भाजपाविरोधात हुकुमशाहीविरोधी लढ्याची भाषा करतात, त्याच भाजपासोबत युतीसाठी उद्धव ठाकरे सातत्याने प्रयत्न करत होते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घडवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यांच्या पक्षातील अनेक खासदार भाजपाकडे जाण्याच्या तयारीत असताना, उद्धव ठाकरे यांनी त्यांना रोखले आणि ‘सर्वांनी एकत्रच भाजपामध्ये जाऊया’ असे आवाहन केले होते. मात्र भाजपाने आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत.”
(हेही वाचा – ठाण्यात लवकरच हवाई टॅक्सी सुरु होणार; मंत्री Pratap Sarnaik यांची ग्वाही)
भविष्यातील परिणामांची इशारा
निरुपम (Sanjay Nirupam) यांनी स्पष्टपणे सांगितले की, “राऊत यांचे बोलणे केवळ खोटे प्रचार आणि दिशाभूल आहे. अशा वक्तव्यांनी पाकिस्तानप्रेमी भूमिका दर्शवण्याचा प्रयत्न होत आहे. देशाच्या सुरक्षेच्या संवेदनशील काळात अशा वक्तव्यांचा जनतेने निषेध करावा.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community