शिवरायांकडून प्रेरणा घेवूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत बदलून दाखविला – फडणवीस

171

भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदा पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केले, तेव्हा त्यांनी रायगडावर जात छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होवून दर्शन घेतले. त्यांच्याकडून प्रेरणा आणि तेज घेऊनच गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बदलून दाखविला, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यापुढेही महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर मावळे म्हणून कार्यरत राहू असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा : प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांना नुकसान भरपाई : शासनाच्या निर्णयाला कोळी समाजाकडून विरोध)

भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि जीवनचरित्र सांगणाऱ्या महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या ‘ ‘जाणता राजा’ या महानाट्याचा पहिला प्रयोग मंगळवारी दादर येथील शिवतीर्थावर पार पडला. १९ मार्चपर्यंत रोज सायंकाळी ६.४५ वा. ‘जाणता राजा’ महानाट्याचा विनामूल्य आनंद मुंबईकरांना घेता येणार आहे.

या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण आज ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत ते खरं स्वातंत्र्य पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. ज्यावेळी चोहिबाजूने अंधकार होता, मोठे राजे मुघलांचे मांडलिक असताना आई जिजाऊंनी स्वराज्याची ज्योत छ. शिवाजी महाराजांच्या मनात प्रज्वलित केली. देव, देश धर्माकरिता लढणारा राजा या नाटकाच्या निमित्ताने अनुभवायला मिळते आहे, असेही ते म्हणाले. विरोधकांना नामोहरम करण्याची उर्जा या कार्यक्रमातून मिळो अशी अपेक्षा भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली. यावेळी आ. अमित साटम, आ. मिहीर कोटेचा, महामंत्री संजय उपाध्याय, संजय पांडे आदी उपस्थित होते.

२५० हून अधिक कलाकारांचा समावेश

माता तुळजा भवानीच्या आरतीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयघोषाच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात नाटकाला सुरुवात झाली. तीन तासांच्या नाटकात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते छत्रपती होण्यापर्यंतचे ऐतिहासिक वैभव पाहायला मिळाले.

नाटकात भव्यता, दिव्यता होती. २५० हून अधिक कलाकार, आकर्षक रोषणाई, आकर्षक वेशभूषा, तोफखाना, घोडेस्वार सैनिक आणि मनाचा ठाव घेणारी गाणी यांनी सजलेले हे महानाट्य हजारो मुंबईकरानी तीन तास मंत्रमुग्ध होऊन पाहिले. हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी, नेत्रदीपक आतषबाजी आणि नवीन रंगमंचासहित शिवजन्म पूर्व काळ, शिवजन्म, शिवरायांचा न्याय निवाडा, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, अफझलखान वध, सुरत छापा, शाहिस्तेखान छापा,आग्र्याहून सुटका आणि रोमहर्षक राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगांचे सादरीकरण करण्यात आले.

महानाट्यात गीतांचा प्रभावी वापर केला गेला आहे. विविध ऐतिहासिक घटनांचा खुलासाही सविस्तरपणे करण्यात आला. ध्वनिमुद्रित संवाद, गाणी आणि पार्श्वसंगीत यांच्यातील मेळ अचंबित करणारा होता. लक्ष वेधून घेणारे नृत्य आणि लोकगीतांतून स्वराज्याचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला होता. महानाट्यात पोवाडा, गोंधळ, अभंग याबरोबर लोकगीतांचा वापर खुबीने करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.