
-
प्रतिनिधी
कोकणातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या दापोली नगरपंचायतीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना उबाठाच्या ममता मोरे यांना बहुमताच्या जोरावर नगराध्यक्षपदावरून पायउतार करत राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी शिवसेना सत्तेत आणत शिवसेना उबाठाला जोरदार झटका दिला आहे. या सत्तांतरानंतर शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कृपा घाग यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने, त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून आता केवळ औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. ही घोषणा २८ मे रोजी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दापोली नगरपंचायतीमध्ये गेले काही आठवडे नगराध्यक्ष पदावरून राजकीय पेच निर्माण झाला होता. मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी शिवसेना उबाठाच्या सत्तेच्या मुळावरच घाव घालत नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला, जो १६ विरुद्ध १ मतांनी मंजूर झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी या ठरावाची अंमलबजावणी केली.
(हेही वाचा – KL Rahul : कधी सातव्या तर कधी सलामीला फलंदाजी करणारा के. एल. राहुल)
दरम्यान, ममता मोरे यांनी हा ठराव बेकायदेशीर असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी नव्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करताच, कृपा घाग यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आणि त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली. या पार्श्वभूमीवर, शिवसेना उबाठाचे नेते अनिल परब यांनी एकेकाळी योगेश कदम (Yogesh Kadam) यांना स्थानिक राजकारणातून दूर ठेवले होते, याचाच राजकीय वचपा कदम यांनी सत्तांतर घडवून काढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दापोलीतील या सत्तांतरामुळे शिवसेना उत्साही, तर शिवसेना उबाठात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवानी खानविलकर यांच्यासह इतर इच्छुकांची चर्चा रंगली असतानाही कृपा घाग यांचा अर्ज एकमेव ठरल्याने त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार हे स्पष्ट झाले आहे. राजकीय डावपेच, रणनीती आणि संख्याबळाच्या खेळीने शिवसेना उबाठाला ‘धोबीपछाड’ देण्यात शिवसेना यशस्वी ठरला आहे. आता २८ मे रोजी होणाऱ्या औपचारिक घोषणेनंतर दापोली नगरपंचायतीच्या नेतृत्वाचा ताबा अधिकृतपणे शिवसेनेच्या ताब्यात जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community