‘सिल्व्हर ओक’ वरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पोलिसांना होती पूर्वकल्पना!

167

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुंबईतील बंगला सिल्वर ओक वरील एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला हे मुंबई पोलिसांचे अपयश असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. मात्र आंदोलक एसटी कर्मचारी हे ‘सिल्वर ओक’ वर धडकणार असणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना हल्ल्याच्या काही तासंपूर्वीच मिळाली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गावदेवी पोलिसांनी नोंदविलेल्या ‘एफआयआर’मध्ये हे म्हटले आहे.

… तर पोलीस अनभिज्ञ कसे राहिले?

शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांंनी केलेला हल्ला हा मुंबई पोलिसांचे आणि गृहखात्याचे अपयश असल्याचे राजकीय नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. आंदोलक सिल्वर ओकवर जाऊन आंदोलन करणार आहेत, याची माहिती वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीना कळते, तर पोलीस या पासून अनभिज्ञ कसे राहिले असा सवाल अनेक नेत्यांकडून विचारला जात आहे. मात्र सिल्वर ओक वर आंदोलनकर्ते आंदोलन करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला हल्ल्याच्या काही तासांपूर्वी मिळाली होती, अशी माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – जाणून घ्या, अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम किती झाले?)

पोलिसांनी एफआयआरमध्ये काय नोंदवला जबाब?

गावदेवी पोलीसानी आंदोलक आणि जेष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात दाखल केलेल्या ‘प्रथम खबरी अहवाल’ (एफआयआर) मध्ये नोंदवलेल्या जबाबात गावदेवी पोलीस ठाण्यातील मिल्स स्पेशल पथकात काम करणाऱ्या पोलीस अंमलदार यांनी म्हटले की, आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की, काही आंदोलनकर्ते एसटी कामगारांना दिलेल्या चिथावणीच्या अनुषंगाने ८ एप्रिल रोजी सिल्वर ओक या ठिकाणी येऊन आंदोलन करणार आहेत. त्यानुसार आम्ही सदरची माहिती दिवसपाळी पर्यवेक्षण पोलीस निरीक्षक यांना दिली आणि साधारण दुपारी ३ वाजण्याचे सुमारास गावदेवी मोबाईल व्हॅन १ व इतर पोलीस अंमलदारासह बी.डी. रोडकडून सिल्वर ओककडे जाणाऱ्या रस्त्यावरती तैनात झालो होतो, असे जबाबात म्हटले आहे. सिल्वर ओकवर आंदोलन होणार असल्याची पूर्वसूचना मुंबई पोलिसांनी काही तासापूर्वीच मिळाली होती, हे या एफआयआरमध्ये नोंदवलेल्या जबाबावरून सिद्ध होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.