पंतप्रधानांकडून वर्धा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत

85

महाराष्ट्रात सेलुसरा येथे झालेल्या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला. दरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो.

वर्धा अपघात अतिशय दुःखद

वर्धेत वाहन कोसळून झालेल्या अपघातावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त केला. ट्वीटरद्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” वर्धा जिल्ह्यात वाहन कोसळून झालेल्या अपघातात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, ही घटना अतिशय दुःखद आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार हा सुद्धा यात होता. सर्व कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो..ॐ शांती. “

वर्धा अपघात अत्यंत वेदनादायी

वर्धा जिल्ह्यात सेलुसरा येथे झालेल्या अपघातावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला. ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना डॉ भारती पवार म्हणाल्या, “वर्धा जिल्ह्यात झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणा-या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आणि वेदनादायी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. सर्व कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो…”

असा घडला प्रकार

वर्धा येथील सेलसुरा नजीक झालेल्या अपघातात सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार विजय राहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा अविष्कारचाही समावेश आहे. मृतांमध्ये निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) यांचा समावेश आहे.

वर्धा-देवळी मार्गावर सोमवारी रात्री दीडच्या सुमारास हा भीषण अपघातात घडला. परीक्षा झाल्यामुळे ते पार्टी करण्यासाठी देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला. अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजकला धडकून गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. जवळपास ४० फूट खोल दरीत गाडी पडल्याने गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकास याबाबत माहिती मिळाली. त्याने वर्ध्याकडे सलोडला येताना सावंगी पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली. सर्व मृतक २५ ते ३५ वयोगटातील असल्याची माहिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.