आता नाना म्हणतात पाच वर्षे मुख्यमंत्री ठाकरेच राहतील

काँग्रेस हायकमांडने जबाबदारी दिली तर नक्कीच मुख्यमंत्री होईन, असे देखील सांगायला ते विसरले नाहीत.

115

महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रं हाती घेतल्यापासून नाना पटोले स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत. त्यातच आता नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हायला हवे, अशी इच्छा काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यानंतर राज्यात उलटसुलट चर्चा रंगली होती. मात्र सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार असून, हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष काम करेल. या सरकारला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असेल, असे नानांनी स्पष्ट केले आहे. तसेच काँग्रेस हायकमांडने जबाबदारी दिली तर नक्कीच मुख्यमंत्री होईन, असे देखील सांगायला ते विसरले नाहीत.

पाच वर्ष उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री

महाविकास आघाडी तयार करत असताना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार काम करेल, हे काँग्रेसच्या हायकमांडने ठरवलेले आहे. त्यामुळे ही पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील आणि त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असेल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार असल्याचंही यावेळी ते म्हणाले.

(हेही वाचाः राजभवनातील ‘त्या’ गायब यादीचा उद्या होणार उलगडा? )

जी जबाबदारी मिळेल, ती पार पाडेन

मुख्यमंत्री कोण होणार हे काँग्रेसचे हायकमांड ठरवेल. दिल्लीतल्या हायकमांडने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली  तर मी मुख्यमंत्री होईन, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. यासोबतच 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर लढवेल, असे संकेतही नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेमध्येतून दिले. मी कोणतेही पद काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून कधीही मागितले नाही. विधानसभा अध्यक्षपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद मी कधीही मागितले नव्हते. मात्र या पदाची जबाबदारी काँग्रेस हायकामांडने माझ्यावर सोपवली आणि ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्याचं काम मी केलं, असे नाना पटोले यांनी सांगितले.

राम मंदिराच्या नावावर भाजपची दुकानदारी

सध्या राम मंदिराच्या जागेच्या खरेदी वरुन घोटाळा होत असल्याची चर्चा आहे. यावरुनच नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. दोन कोटींची जमीन अठरा कोटी रुपयाला विकल्याने यात भाजपचा खरा चेहरा समोर आल्याची टीका नाना पटोले यांनी केली. राम मंदिराच्या नावावर भाजपने नेहमीच दुकानदारी केली आहे. राम मंदिराच्या वर्गणीच्या नावाखाली चौदाशे कोटी रुपये जमा करण्यात आले. यावर काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर ही वर्गणी जमा करण्याचे बंद करण्यात आले, असा आरोपही नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे.

(हेही वाचाः ‘नानां’च्या आक्रमकतेमागे नक्की कारण काय? वाचा…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.