No Confidence Motion : श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; UPA काळातील भ्रष्टाचारांची वाचून दाखवली यादी 

103

मणिपूर प्रकरणी विरोधकांनी मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव No Confidence Motion मांडला, त्यावर मंगळवार, ८ ऑगस्टपासून लोकसभेत चर्चा सुरु झाली. त्यावेळी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. हा प्रस्ताव स्कीम विरोधात स्कॅम आहे, असे सांगत खासदार शिंदे यांनी UPA काळातील भ्रष्टाचाराची यादीच वाचून दाखवली. युपीए नावाची लाज वाटत असल्यानेच यांनी इंडिया हे नाव दिल्याची टीका करत खासदार शिंदे यांनी सदनात हनुमान चालिसाचेही पठण केले.

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

आज अविश्वास प्रस्तावावर No Confidence Motion नव्हे तर अविश्वासाविरोधात जनविश्वासाची चर्चा होत आहे. तुमच्याविरोधात लोकांनीच दोन वेळा अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आहे, एकदा 2014 आणि दुसऱ्यांदा 2019 मध्ये. आता 2024 मध्ये जनता हॅट्ट्रीक करणार आहे. यांनी आपल्या आघाडीचे युपीए हे नाव बदलून इंडिया असे केले आहे. यामुळे देशातील लोक आपल्यासोबत येतील असे यांना वाटते. मात्र यांना युपीए नावाची लाज वाटत होती असे मला वाटते. कारण युपीएचे नाव ऐकताच लोकांना भ्रष्टाचार आणि घोटाळे आठवतात. म्हणूनच लोकांनी 2014 मध्ये देशाची सूत्रे मोदीजींकडे दिली. ज्यांच्याकडे कोणताही नेता नाही, नियत नाही आणि निती नाही त्यांची ही आघाडी आहे. या आघाडीतील प्रत्येक नेता पीएम इन वेटिंग आहे. प्रत्येकाला वाटतं मी पीएम होईल, कारण यांच्या टिमला कॅप्टनच नाही आणि यांना मॅच खेळून वर्ल्डकप जिंकायचाय. मराठीत एक म्हण आहे, अडला हरी, गाढवाचे पाय धरी. ही आघाडी नसून विनाशाची युती आहे. ही स्किम वर्सेस स्कॅमची लढाई आहे.

विरोधकांना मणिपूरवर फक्त राजकारण करायचेय

विरोधकांना केवळ मणिपूरवर राजकारण करायचे आहे. काँग्रेस कधीही ईशान्येकडील राज्यांविषयी गंभीर नव्हती. त्यामुळेच तिथल्या लोकांनी काँग्रेसचा हात सोडला.

(हेही वाचा NewsClick : चीनचे दलाल अभिसार शर्मा ते तिस्ता सेटलवाड)

महाराष्ट्रात प्रकल्प थांबवले

महाराष्ट्रात अडीच वर्षांच्या काळात केंद्राचे प्रकल्प थांबवण्याचेच काम करण्यात आले. अडीच वर्षांत केवळच अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा विक्रम तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी केला. 2019 मध्ये तुम्ही कुणाचे फोटो लावून निवडणूक लढवली आणि लोकांनी कुणाला बहुमत दिले. मात्र निवडणुकीनंतर स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत काँग्रेससोबत आघाडी यांनी केली. यांनी मतदारांसोबत गद्दारी करण्याचे काम केले. 13 कोटी मतदारांशी गद्दारी यांनी केली. महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणण्यावर यांनी निर्बंध आणले असे म्हणत श्रीकांत शिंदेंनी हनुमान चालिसाचे पठणही सदनात केले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारे लोक आहोत. आम्ही केवळ हिंदुत्वाचे नाव घेत नाही. सावरकरांना शिवी देणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसण्याचे पाप काही लोक करत आहेत. हाच यांचा इंडिया आहे अशा शब्दांत शिंदे यांनी टीका केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.