नवाब मलिक यांची अस्पष्ट भूमिका आणि आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा समीर भुजबळ यांच्याकडे देण्याचे निश्चित केले आहे. मात्र, त्याला राष्ट्रवादीतूनच विरोध होत असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राधान्य देण्याऐवजी उपऱ्यांना संधी दिली जात असल्याची भावना खासगीत व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने राज्यभरात ताकद वाढवण्यासाठी आपल्या सर्व ९ मंत्र्यांसह राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्हयांची जबाबदारी सोपवली आहे. त्यात मुंबईची जबाबदारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहे. असे असताना त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याकडेही मुंबईच्या अध्यक्ष पदाची धुरा देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
दरम्यान, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केल्यानंतर अधिकारपदे उपभोगण्याची वेळ येते तेव्हा नेत्यांची मुले बाजी मारतात; कार्यकर्ते केवळ घोषणा देण्यापूरते उरतात. प्रत्येक पक्षात हीच स्थिती आहे, अशी भावना राष्ट्रवादीच्या एका मुंबईतील नेत्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर व्यक्त केली.
(हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवारांना कोणी डिवचले ?)
भुजबळांची गरज का?
- राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे २०१९ मध्ये मलिक यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.
- परंतु, मनी लाँडरिंगप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने २२ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांना अटक केली. मलिक सध्या जामिनावर आहेत.
- काही अटींच्या अधीन राहून जामीन दिल्यामुळे त्यांना या पदावर राहणे अशक्य आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा व मुंबई महापालिकेची निवडणूक विचारात घेऊन समीर भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
- नाशिकमध्ये राष्ट्रवादीसाठी काम करणारे समीर यांचा मुंबईतही कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community