महाविकास आघाडीला डिस्टर्ब करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न नाही – जयंत पाटील

87

महाविकास आघाडीला डिस्टर्ब करण्याचा राष्ट्रवादीचा कधीच प्रयत्न राहिला नाही किंवा एकला चलो ही भूमिका राहिलेली नाही. तिन्ही पक्ष एकत्र रहावेत हीच आहे. त्यामुळे प्रफुल पटेल हे परदेशी असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. कोणत्या परिस्थितीत निर्णय झाला हे पाहिल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल,असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

नाना पटोले यांचा आरोप चुकीचा आहे. राज्यात येणा-या काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक नेतृत्वाने सर्वांना एकत्र बसवून महाविकास आघाडी एकत्र रहावी असे प्रयत्न करणे अपेक्षित होते. गोंदियामध्ये नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे वेगळं काम झालं असेल तर त्याची नोंद पक्ष घेईल असेही जयंत पाटील म्हणाले.

…म्हणून अडचणी निर्माण होत असाव्यात

स्थानिक नेत्यांचे कुणाशी पटतं तर कुणाशी पटत नाही किंवा टोकाची मतमतांतरे कुणाची झाली आहेत, याचादेखील दुस-या बाजूने विचार करून घेण्याची आवश्यकता आहे. त्याची माहिती घेऊ. नाना पटोले यांनी संपर्क साधला होता, मात्र स्थानिकदृष्टया मनं दुभंगलेली असल्यामुळे अडचणी निर्माण होत असाव्यात कदाचित याबाबतीत तपशीलात जाऊ असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

पाटलांची भाजपवर टीका

राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकलं पाहिजे, असा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने निर्णय वेगळा दिला. जर आणखीन पुढे दोन – तीन महिने थांबण्याची तयारी ठेवली असती, तर इम्पिरिकल डेटा आला असता आणि सर्व आरक्षण मिळाली असती व सर्वांना न्याय मिळाला असता मात्र सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. त्यावर काही विधान करायचं नाही, परंतु मध्यप्रदेशमध्ये सुध्दा भाजपला ओबीसी आरक्षण टिकवता आले नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ओबीसींच्या आरक्षणविरोधी महाविकास आघाडी सरकारने भूमिका घेतली हे विरोधकांचे आरोप खोडसाळ आहेत. मुळात भाजपची सत्ता असताना ओबीसींना ते आरक्षण देऊ शकले नाहीत असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

प्रयत्न दोन्ही बाजूने सुरु

आता सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्याचा निर्णय दिला आहे, त्यानुसार त्याची तयारी सुरू आहे. इम्पिरिकल डेटा गोळा करणा-या समितीने दोन – तीन महिन्यांत डेटा गोळा केला असेल, तर कदाचित निवडणुका होऊ शकतात. परंतु ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत या भूमिकेवर महाविकास आघाडी सरकार असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणार नाही. प्रयत्न दोन्ही बाजुने सुरू आहेत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पाटलांची मिश्किल टीका

उपरोधिकदृष्टया सदाभाऊ खोत भाजपच्या विरोधात बोलू शकत नाहीत कारण त्यांची विधानपरिषदेची मुदत संपत आली आहे. त्यामुळे काय बोलायचं म्हणून ‘शालीतून जोडा’ त्यांच्याच आमदाराने भाजपला मारला आहे, अशी मिश्किल टीका जयंत पाटील यांनी केली. सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यावर हसायचं की रडायचं हेच कळत नाही. सदाभाऊ खोत यांनी महागाईचे समर्थन केले आहे. या देशात महागाईने सामान्य जनता होरपळत आहे. एवढी प्रचंड महागाई आहे. ६० रुपयांवर पेट्रोल गेले, तरी केंद्रात बसलेले नेते मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत होते. आज १२५ वर पेट्रोल गेले. परवाच गॅस ५० रुपयांनी वाढला. देशभर लोकांना महागाईची झळ बसली आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनादेखील महागाईची झळ बसली असेल, तर कदाचित उपरोधाने ते बोलले असतील, अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

( हेही वाचा: महागाईचा आलेख वाढता, महागाई उच्चांक गाठणार रॉयटर्सचा निष्कर्ष )

पहिल्यांदाच केंद्र सरकारमधून राज्यातील व्यक्तीना संरक्षण

राज ठाकरे यांना कोण कशाला इजा करेल. मला वाटत नाही राज ठाकरे यांना धोका आहे पण त्यांना भीती वाटत असेल तर संरक्षण दिले पाहिजे. आमची कोणतीही तक्रार नाही असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. अलीकडे राज्यात नवीन फॅशन सुरू झाली आहे, केंद्र सरकारमधूनच संरक्षण पुरवलं जातं आणि त्यातच दोन – तीन उदाहरणे झाली आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र सरकार राज्यातील व्यक्तींना संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची भाजपबरोबर चांगली मैत्री असेल, तर तुम्हालाही संरक्षण देण्याची व्यवस्था होऊ शकते, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.