पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायदा, २०२५ च्या विरोधात झालेल्या हिंसाचारात (Murshidabad Violence) पिता-पुत्राच्या हत्येतील मुख्य आरोपी झियाउल शेखला पोलिसांनी अटक केली आहे.
१२ एप्रिल रोजी जाफराबाद, शमशेरगंज येथे हरगोबिंद दास (७२) आणि त्यांचा मुलगा चंदन दास (४०) यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात शेखची अटक ही चौथी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झियाउल शेखने दास कुटुंबाच्या घरावर हल्ला करण्यासाठी जमावाला चिथावणी दिली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टॉवर लोकेशनवरून त्याची घटनास्थळी उपस्थिती सिद्ध झाली आहे. (Murshidabad Violence)
पोलिसांच्या विशेष कार्य दल (एसटीएफ) आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला उत्तर दिनाजपूरमधील चोपडा येथून अटक केली. यापूर्वी कालू नाडर आणि दिलदार नाडर नावाच्या दोन भावांना बीरभूममधील मुराराई आणि मुर्शिदाबादमधील सुती येथून अटक करण्यात आली होती. तिसरा आरोपी इंझमाम उल हक याला सुरीपारा गावातून अटक करण्यात आली. १२ एप्रिल रोजी झालेल्या या हिंसाचारात १७ वर्षीय किशोर इजाज अहमद शेखचाही गोळी लागून मृत्यू झाला. या घटनेनंतर, पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिक एफआयआर नोंदवले आहेत आणि २७६ हून अधिक लोकांना अटक केली आहे. हिंसाचाराच्या (Murshidabad Violence) पार्श्वभूमीवर, कोलकाता उच्च न्यायालयाने केंद्रीय दलांच्या तैनातीचे आदेश दिले, ज्या अंतर्गत बीएसएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या. राज्याचे डीजीपी राजीव कुमार म्हणाले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे.