
-
प्रतिनिधी
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन सतर्क आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी दिली. मात्र, त्यांनी यावेळी मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
कोकणात पावसाचा तडाखा, पण वाहतूक सुरळीत
राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी स्पष्ट केलं की, “दापोली-खेड मार्गावर रस्ता खचला असला तरी वाहतूक कोंडी झालेली नाही. पर्यायी मार्गांची तत्काळ व्यवस्था केली आहे. पावसाची सुरुवात यंदा १० मेपासूनच झाल्याने काही रस्त्यांची कामं रखडली, मात्र नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावं.”
(हेही वाचा – Mumbai Rain : मे महिन्यातील समुद्राच्या मोठ्या भरतीकडे केले दुर्लक्ष; पावसाने दाखवला महापालिकेला इंगा)
“मुंबई बुडाली, पण २५ वर्षे कोणी वाचवलं नाही!”
मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर भाष्य करताना, कदम (Yogesh Kadam) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर रोखठोक शब्दांत टीका केली. “ते पालकमंत्री असताना सुद्धा मुंबईत पाणी तुंबायचं. त्यांनी किती पाहणी केली, हे सगळ्या जगाला माहिती आहे. २५ वर्षे मुंबई लुटली आणि काहीही बदल घडवता आला नाही. आता शिंदे साहेबांच्या कारभारात जर निचरा लवकर झाला, तर त्याचं श्रेय त्यांनाही द्यायला हवं,” असा टोला त्यांनी लगावला.
“मोठं मन ठेवा, परिस्थितीत राजकारण नको!”
“पावसात नागरिक त्रस्त असताना राजकारण करणं दुर्दैवी आहे. शिंदे साहेब स्वतः फिल्डवर उतरले आहेत. त्यांनी घेतलेला सिमेंट रस्त्यांचा निर्णय योग्य आहे, एकदा रस्ता झाला की पुढची अनेक वर्षं तो नीट राहतो. रस्त्यांचं काँक्रिटीकरण केल्यामुळे पाणी तुंबण्याचं प्रमाणही घटलं आहे,” असं त्यांनी सांगितलं.
(हेही वाचा – Mumbai Rain : किरकोळ पावसात हिंदमाताची ही अवस्था; मग पुढे काय?)
मिठी नदी आणि कंत्राट प्रकरणावरून पुन्हा टीका
मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या कंत्राटप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीविषयी बोलताना, कदम म्हणाले, “कंत्राट कुणाला दिलं, कोविडमध्ये कुणाला संधी मिळाली, हे सर्वांना माहित आहे. पोलिसांना पुरावे मिळाले असतील म्हणून चौकशी होते आहे. जर कंत्राटदार हे कुणाचे ‘जवळचे मित्र’ असतील, तर सावध राहणं योग्य ठरेल. दोषी सापडल्यास कारवाई होणारच.”
“मी स्वतः मेट्रोने प्रवास केला, उद्धवजींनी कधी केला?”
राज्यमंत्री कदम (Yogesh Kadam) यांनी मेट्रो प्रकल्पावरूनही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “आज भ्रष्टाचाराचे आरोप करणारे उद्धवजी, त्या मेट्रो प्रकल्पाच्या कंत्राट वाटपात सत्तेत सहभागी होते, हे ते विसरले आहेत. मी स्वतः मेट्रोने प्रवास केला आहे. मुंबईकरांना राजकारण नको, सुविधा हव्यात. त्यामुळे शिंदे साहेब स्वतः रस्त्यावर उतरले आहेत,” असं ते म्हणाले.
(हेही वाचा – Veer Savarkar : ‘आज आपलं अस्तित्व जे टिकून आहे, ते सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळेच’; मंजिरी मराठे यांचे प्रतिपादन)
“राजकारण थांबवा, मदतीला धावा”
अखेर मंत्री कदम (Yogesh Kadam) यांनी स्पष्ट इशारा दिला – “मुंबईकर त्रासात असताना त्यांच्या मदतीसाठी खंबीर उभं राहणं गरजेचं आहे. राजकारण थांबवा, मदतीला धावा!”
मुंबईतील प्रशासनाचा प्रतिसाद, रस्त्यांचं काँक्रिटीकरण आणि शिंदे सरकारची कृती यावर भर देत कदम यांनी ठाकरे पितापुत्रांवर थेट आणि आक्रमक हल्ला चढवत राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community