आता दिल्लीतही ४० गावांची नावे बदलणार, औरंगाबादचे संभाजीनगर कधी होणार?

72

देशात २०१४ ला सत्तांतर झाले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातही अमुलाग्र बदल झाला. भाजप स्पष्ट बहुमताने सत्तेवर आले. या दोन्ही राज्यांतील बहुतांश रेल्वे स्थानके आणि शहरांची नावे बदलून ती हिंदू धर्माशी अनुषंगाने करण्यात आली. आता दिल्लीतीलही ४० गावांची नावे बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र चर्चेत आला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची घोषणा स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ४ दशकांपूर्वी केली होती, आता शिवसेनेचे सरकार राज्यात येऊन अडीच वर्षे झाली, तरी अद्याप बाळासाहेबांची इच्छा पूर्ण का झाली नाही, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

पुन्हा महाराष्ट्र आला चर्चेत!

देशात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशानंतर आता दिल्लीतही गावांच्या नामांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. येथील भाजपशासित महापालिकाअंतर्गत असलेल्या मोहम्मदपूर गावाचे नाव बदलून माधवपूर असे करण्यात आले आहे. दिल्ली भारतीय जनता पक्षानेही या गावाचे बदलेल्या नावाचा फलक लावला. या गावाचे नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याविषयीची माहिती देताना दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, आतापासून हे गाव माधवपूर म्हणून ओळखले जाईल. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आजही गुलामगिरीची ओळख कायम आहे, हे कोणत्याही दिल्लीकराला आवडणारे नव्हते. भाजपचे नगरसेवक भगतसिंग टोकस यांनी सांगितले की, हे हिंदूबहुल गाव आहे. म्हणूनच त्याचे नाव बदलणे आवश्यक आहे. भगतसिंग टोकस यांनी दिल्ली महापालिकेत प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव मंजूर झाला. अशा प्रकारे दिल्लीतील ४० गावांची नावे बदलण्यात येणार आहे.

(हेही वाचा सरकारी मेगाभरती! अडीच लाख रिक्त पदे भरणार)

राज ठाकरे सेनेवर टीका करणार! 

आता महाराष्ट्राकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. राज्यात औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्याला ४ दशके उलटली. तरीही हे शक्य झाले नाही. आता राज्यात शिवसेनेचे सरकार आहे. तरीही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. त्यामुळे आता पुन्हा शिवसेना टीकेची धनी बनली आहे. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर टीका केली होती. आता राज ठाकरे १ मे रोजी थेट औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत, त्याआधीच तेथील बॅनर्सवर संभाजीनगर असाच शहराचा उल्लेख करण्यात येत आहे. राज ठाकरे या विषयावर आणखी तीव्र शब्दांत बोलतील, अशी शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.