औरंगाबाद सभेतील वादग्रस्त विधानांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल कलम 116,117, 153(अ) आणि महाराष्ट्र पोलिस कायदा 135 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पण 14 वर्षांपूर्वी ज्यावेळी राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती, तेव्हा त्याचा मनसेला निवडणुकीत फार मोठा फायदा झाला होता. त्यामुळे तसाच फायदा आताही मनसेला होणार का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.
(हेही वाचाः बाळासाहेबांनी घडवलेल्या ‘त्या’ इतिहासाची पुनरावृत्ती राज ठाकरे करणार, मनसेचा दावा)
काय होतं प्रकरण?
मनसेच्या स्थापनेनंतर लगेचच राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेने आक्रमक पवित्रा घेत राज्यातील राजकारणाला हादरवून सोडले. खळखट्याक ही मनसेची स्टाईल बनली. अनेक ठिकाणी मनसेने आंदोलनं केली, पण मनसेच्या एका आंदोलनाचे पडसाद केवळ राज्यातच नाही, तर दिल्लीतही उमटले. 2008 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रात रेल्वेची नोकर भरत्यांसाठी परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षांसाठी देशभरातील सर्व राज्यांतून इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल झाले होते.
(हेही वाचाः ‘या’ विधानांमुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, पहा व्हिडिओ)
यात उत्तर भारतीयांची संख्या ही सर्वाधिक होती. त्यावेळी लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री होते. राज्यात होणा-या या परीक्षांसाठी राज्यातील मराठी तरुणांना प्राधान्य देण्यात यावं, अशी मनसेची मागणी होती. पण अशातच मराठी तरुणांचे अर्ज नाकारण्यात आल्याचे आणि काहींना हॉल तिकीटही न दिल्याचे समोर आले. तेव्हा मनसेच्या उत्तर भारतीय विरोधी भूमिकेला यामुळे चांगलीच धार चढली. तब्बल 13 परीक्षा केंद्रांमध्ये शिरुन मनसैनिकांनी उत्तर भारतीय उमेदवारांना बेदम मारहाण केली. याबाबत राज ठाकरे यांच्या विरोधात कल्याण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
राज ठाकरेंना झाली अटक
त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार सत्तेत होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी कारवाईसाठी जलद पावले उचलली. अखेर 21 ऑक्टोबर 2008 रोजी रात्री 2.45 वाजता रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहातून राज ठाकरे यांना अटक करण्यात आली. त्यावेळी राज ठाकरे यांना कल्याण न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण काही काळातच राज ठाकरे यांना जामीन मिळाला.
(हेही वाचाः राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, अटक होणार?)
मनसेला पुन्हा फायदा होणार?
राज ठाकरे यांच्या या अटकेचा आणि मनसेच्या राज्यव्यापी आंदोलनाचा मनसेला 2009 च्या विधानसभा निवडणुकीत चांगलाच फायदा झाला. या निवडणुकीत पहिल्याच फटक्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले. त्यावेळी मनसेचा नव्याने जन्म झाला होता. तर आता राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलत मनसेला नवसंजीवनी दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांत राज ठाकरेंवरील कारवाईचा मनसेला पुन्हा एकदा फायदा होणार का, असंही आता बोललं जात आहे.