नाशिक बस दुर्घटनेवर पंतप्रधानांनी व्यक्त केली हळहळ; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर

99

नाशिक येथील बस दुर्घटनेत 11 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसेच, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार जाहीर करण्यात आले आहेत. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना. या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होवोत, स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहेत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

गृहमंत्र्यांनी व्यक्त केला शोक 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाशिक येथे झालेल्या अपघातावर तसेच जीवित हानीवर तीव्र शोक व्यक्त केला. ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना अमित शाह म्हणाले, ” नाशिक (महाराष्ट्र) येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत, ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो. ”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांना तातडीने आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या सहकारी आ. देवयानी फरांदे या सुद्धा रुग्णालयात असून समन्वय ठेवून आहेत.

अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली- अजित पवार 

यवतमाळहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या खासगी बसला औरंगाबाद-नाशिक मार्गावर अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. अपघातातील जखमींना वैद्यकीय उपचार व मृतांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत करावी. भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती व प्रवाशांचे मृत्यू टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.