राज्यपालांकडून भूमिका स्पष्ट, अमित शाहांना पत्र; म्हणाले, ‘…स्वप्नातही कल्पना करू शकत नाही’

91

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यपालांनी माफी मागावी, त्यांची पदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र आता राज्यपालांनी पहिल्यांदा सविस्तर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे.

(हेही वाचा – Indian Navy: आता महिला होणार ‘कमांडो’; भारतीय नौदलाचा ऐतिहासिक निर्णय)

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कोश्यारींनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी पत्राद्वारे त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगड, सिंदखेडराजासारख्या पवित्र स्थळांवरील प्रवासाचा दाखलाही दिला आहे. महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना स्वप्नातही करु शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे, असे पत्र कोश्यारींनी अमित शाह यांना लिहिले आहे.

काय म्हटले राज्यपालांनी पत्रात

माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केलं. मी म्हणालो की, मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत. हे सारे आदर्श आहेतच पण, युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्श सुद्धा शोधत असतेच. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात. याचाच अर्थ डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा या सुद्धा अनेक कर्तव्यशील व्यक्तींचा युवा पिढीला आदर्श राहू शकतो.

आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढविणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो, याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा तर होत नाही. यामध्ये कुठेही तुलना करणे हा विषयच असू शकत नाही. आता जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे, ते केवळ महाराष्ट्राचेच नाही, तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत.

कोरोनाच्या काळात, जेथे अनेक ‘महनीय’ आपल्या घरातून बाहेर निघत नव्हते, तेव्हा मी या वयात सुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र स्थळांवर पायी जाऊन दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर पुत्राला जन्म देणार्‍या वंदनीय माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथेही गेलो. गेल्या 30 वर्षांत त्याठिकाणी जाणारा मी पहिला राज्यपाल असेन. तेथे मी हवाई मार्गाने नाही, तर मोटारीने गेलो. माझ्या कथनाचा मतितार्थच हा होता की, छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

आदरणीय अमितजी, आपण जाणताच की, 2016 मध्ये जेव्हा आपण हलदानी येथे होतात, तेव्हाच 2019 पासून कोणतीही निवडणूक लढणार नाही किंवा राजकीय पदांपासून दूर राहीन, अशी माझी इच्छा प्रदर्शित केली होती.परंतू मा. पंतप्रधान आणि आपल्यासारख्यांचा माझ्यावरील स्नेह आणि विश्वास पाहून मी महाराष्ट्रासारख्या महान राज्याचे राज्यपालपद स्वीकारले. माझ्याकडून कधी अनावधानाने चूक झालीच, तर तत्काळ खेद व्यक्त करणे किंवा क्षमायाचना करण्यास मी कधीच संकोच करीत नाही.

मुगल काळात साहस, त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत असलेल्या महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.